Dr. Parinay Fuke
Dr. Parinay Fuke Sarkarnama
विदर्भ

Fitness Funda : रोज पाच किलोमीटर चालणे, योग-प्राणायाम करून परिणय फुके राहतात फिट..

सरकारनामा ब्यूरो

Political Leader's Fitness : राजकीय नेते (Political Leaders) म्हटले की, त्यांच्याकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्या भोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय दिसतं. पण त्यासाठी त्यांना किती कष्ट उपसावे लागतात, हे त्यांचं त्यांनाच माहिती. राजकीय कार्यक्रम सोडले तर हे लोकसुद्धा सामान्य लोकांसारखेच असतात.

महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांच्याशी राजकारणाव्यतिरिक्त गप्पा मारत असताना त्यांनी आपल्या फिटनेसचा फंडा ‘सरकारनामा’ला सांगितला. मतदारसंघात जाऊन लोकांना भेटणे, कार्यक्रमांना हजेरी लावणे. याशिवाय जनतेच्या कामानिमित्त सतत मुंबई, दिल्ली आणि इतरत्र प्रवास करावा लागतो.

टेनिसपटू, जलतरणपटू..

यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि त्याचा फटकाही बसतो. त्यामुळे कुठेही असलो तरी दररोज १ तास ५ किलोमीटर पायी चालणे, हा व्यायाम नियमित करतो. सोबतच योगा आणि प्राणायाम करण्यावरही भर असतो. समाजकारण आणि राजकारणाव्यतिरिक्त जलतरणपटू म्हणून ब्राझील आणि स्वित्झर्लंड येथे डॉ. फुकेंनी भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. टेनिस स्पर्धेत राष्‍ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

सुटी नाहीच..

राजकारण आणि समाजात काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून रोज चालण्याच्या व्यायामाव्यतिरिक्त जलतरण आणि टेनिस खेळण्याचे छंद जोपासण्याकडे कल असतो. आमच्या आयुष्यात सुटी हा प्रकारच नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात वेळ काढून पोहणे आणि टेनिस खेळतो, असे डॉ. फुके म्हणाले.

नियंत्रित आहार..

वजन वाढल्यामुळे काही वर्षांपूर्वी किंवा एका ठिकाणी बराच वेळ बसून काम करणेही अवघड होत होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने वाढलेले वजन अडचणीचे ठरत होते. जेवणाच्या वेळाही ठरलेल्या नसल्याने वजन वाढण्यास कारणीभूत ठरले. व्यायाम व आहारावर नियंत्रण आणल्यास सकारात्मक परिणाम होऊ शकतो, हे लक्षात आले आणि आपण खेळाडू असूनही फिटनेस राखला नसल्याचे शल्यही मनात होते. त्यामुळे व्यायाम व नियंत्रित आहाराचा पर्याय स्वीकारल्याचे आमदार डॉ. परिणय फुके सांगतात.

सेमिनरी हिल्समध्ये व्यायामाचे वातावरण..

घराजवळ फिरायचे म्हटले तर ओळखीचे अनेकजण भेटतात. त्यामुळे चालण्यापेक्षा भेटीगाठीच जास्त होत. मग नागपूर शहरातील काहीसा मोकळा भाग व केंद्र सरकारचे अधिक कार्यालये असलेल्या सेमिनरी हिल्स परिसराची चालण्यासाठी निवड केली. सेमिनरी हिल्स परिसरात एका ठिकाणी गाडी लावायची आणि जवळपास ५ किलोमीटर फिरणे सुरू केले. या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असते. झाडांची संख्याही जास्त असल्याने शुद्ध हवा व ऑक्सिजनही चांगला मिळतो. अनेकजण या भागात फिरायला येत असल्याने व्यायामाचे एक वातावरण आपोआप तयार होते.

डाॅ. दीक्षित पॅटर्न..

डॉ. दीक्षित यांचा पॅटर्न आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे दोन जेवणाच्या मधात काहीही खात नाही. फक्त दोन वेळा संतुलित आहार घेतो. यातही तेलकट, तुपकट पूर्णपणे टाळतो. जेवणात सलाड आवर्जून घेतो. सलाडमुळे चयापचयाची क्रिया चांगली होते. रात्रीच्या जेवणात भात घेत नाही. यामुळेच अजूनही माझे वजन नियंत्रणात आहे. दररोज चालणे व नियंत्रित आहार हेच माझ्या फिटनेसचे रहस्य असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT