Parinay Fuke Banner. SArkarnama
विदर्भ

Parinay Fuke News : डॉ. परिणय फुकेंच्या बॅनरची भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांना का वाटते भीती ?

Bhandara-Gondia : खासदार सुनील मेंढेंपासून नाना पटोले, प्रफुल्ल पटेलांपर्यंत डॉ. फुकेंच्या बॅनर्सची चर्चा.

अभिजीत घोरमारे

Parinay Fuke News : एखाद्या नेत्याचे चाहते तसेच कार्यकर्त्यांचे प्रेम दुसऱ्या विरोधी नेत्याच्या डोळ्यांत किती खुपते, याचे उदाहरण भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत पाहायला मिळाले आहे. भाजपचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्समुळे जिल्ह्यातील अनेक नेते दुखावले आणि चर्चांना उधाण आलेले आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांना डॉ. परिणय फुकेंच्या बॅनर्सची इतकी धास्ती का वाटते, असा प्रश्न आता जाणकारांना पडला आहे. भंडारा-गोंदियाच्या इतिहासात कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर डॉ. परिणय फुके यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनी बॅनरबाजी केली आहे. त्यातही गोंदिया जिल्ह्यात फलकांची संख्या अधिक पाहायला मिळाली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात डॉ. फुकेंच्या फलकांची संख्या लक्षात घेता, अचानक त्यांचा चाहता वर्ग वाढल्याने जिल्ह्यातील नेत्यांना ही बाब खुपली आहे.

साहजिकच जिल्ह्यातील नेते डॉ. परिणय फुके यांची वाढत असलेली लोकप्रियता बघून कुठेतरी नाराज झाल्याचे बोलले जात आहे. या नाराजीची पहिली सुरुवात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट गटाचे कार्याध्यक्ष, तसेच राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत मतदारसंघातील या विषयावर भाष्य केले. गोंदियात भाजपच्या काही नेत्यांची बॅनरबाजी सध्या सुरू आहे. यावर बोलताना ‘फलक इतके स्वस्त झाले आहेत, की लोक स्वत:चा चेहरा झळकवून काल्पनिक खासदार म्हणवून घेत आहेत,’ असा टोला बॅनरबाजी करणाऱ्यांना लगावला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल या फलकबाजीने चांगलेच दुखावले असल्याचे दिसते. या लिस्टमध्ये दुसरा क्रमांक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा आहे. तुमसर येथे काँग्रेसद्वारे आयोजित एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष ही नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांना आताच खासदार झाल्यासारखे वाटते, असा टोला नाना पटोले यांनी डॉ. फुके यांचे नाव न घेता लगावला होता.

तिसरा क्रमांक भंडारा-गोंदियाचे विद्यमान भाजप खासदार सुनील मेंढे. त्यांनीही अप्रत्यक्षपणे लोकसभेसाठी जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्यावे, याचा विचार व्हावा, अशी प्रतिक्रिया देऊन अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांपर्यंत आपले मत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडी बघता डॉ. परिणय फुके यांच्या फलकावर अप्रत्यक्ष टीका करून जिल्ह्यातील नेत्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात डॉ. परिणय फुके यांची धास्ती घेतली असल्याचा संदेशच दिला आहे.

नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भंडारा-गोंदियातील भाजप मृतपाय झाली होती. अशा स्थितीत नाना पटोले यांना टक्कर देणारा नेता भाजपमध्ये जिल्ह्यात उपलब्ध नव्हता. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेता भंडारा-गोंदियाला लाभला असताना भाजप आपले हातपाय भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रोवू शकेल, अशी परिस्थिती तेव्हा नव्हती. ही सर्व परिस्थिती बघता हातातून भंडारा-गोंदिया जिल्हा जाईल, अशी भीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत होती आणि त्यातूनच त्यांनी डॉ. परिणय फुके यांना भंडारा गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी दिली.

वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी डॉ. फुकेंनी विशेषत्वाने पार पाडल्याचे दिसून येत आहे. दोन दिग्गज नेत्यांना टक्कर देऊन भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व पुन्हा निर्माण केले आहे. यासाठी डॉ. परिणय फुके यांचा जीवलग मित्र असलेल्या खासदार सुनील मेंढे यांचीही त्यांना मदत मिळालेली आहे.

आज भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपही प्रबळ दावेदार आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणात भाजपला वगळून चालणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता परिणय फुके यांनीसुद्धा भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी इच्छुक भाजप उमेदवार म्हणून आपली दावेदारी दाखविल्याने जिल्ह्यातील नेत्यांना याचं टेन्शन आले असल्याचे डॉ. फुकेंच्या फलकावरून होत असलेल्या टीकांवरून सध्या तरी दिसून येत आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT