Parinay fuke Sarkarnama
विदर्भ

Parinay Fuke : गोवारी समाजावरून परिणय फुकेंचा महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले...

Govari Shahid Din : 'सरकारला सर्वोच्च न्यायालयात समाजबांधवांची बाजू मांडण्यात अपयश

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Political News : राज्यात भाजपचे सरकार असताना गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या. यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी समाजाला सर्व सवलती दिल्या.

आपणही आदिवासी विकास मंत्रिपदाच्या कार्यकाळात गोवारी समाजाला 'कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट' मिळावे, अशी व्यवस्था केली. परंतु 2020-2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जात प्रमाणपत्र असूनही गोवारी समाजाची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली, अशी जोरदार टीका भाजप नेते व माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली.

आदिवासी गोवारी शहीद स्मृतिदिनानिमित्त नागपूर येथील झिरो माईल परिसरातील गोवारी स्मारक येथे जात डॉ. फुके यांनी अभिवादन केले. 1994 मध्ये आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करताना शहीद झालेल्या सर्व गोवारी बांधवांना त्यांनी आदरांजली वाहिली.

डॉ. फुके म्हणाले, 'राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या सवलतींमुळे आदिवासी गोवारी समाजातील युवक-युवती चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर आहेत. उच्च न्यायालयातील लढाई यशस्वी झाल्यानंतर 2018-19 मध्ये गोवारी समाजबांधवांना शैक्षणिक अभ्यासक्रमातील सवलत सुरू झाली होती. परंतु महाविकास सरकार सत्तेवर आल्यावर सर्व सवलती बंद करण्यात आल्या. हा आदिवासी गोवारी समाजावर मोठा अन्याय आहे.'

'सरकारला सर्वोच्च न्यायालयात समाजबांधवांची बाजू मांडण्यात अपयश आले. त्यामुळे गोवारी बांधवांना मिळणाऱ्या सवलती मिळणे बंद झाले आहे. सुप्रीम कोर्टातील हा लढा अजूनही सुरू असून, गोवारी बांधवांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठीच्या लढाईत आपण सदैव सोबत राहू', अशी ग्वाही डॉ. फुके यांनी दिली.

आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलाश राऊत, माजी आमदार मिलिंद माने, नरेश बरडे, जयदेव राऊत, माहेश्वरी नेवारे, अनंत जगणीत, हेमराज नेवारे, सुरेश कोहळे, मुख्य सचिव सुरेन्द्र राऊत आदी समाज बांधवांसोबत डॉ. फुके यांनी विस्तृत चर्चा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी डॉ. फुकेंनी सांगितले, 'राज्यात भाजपचे शासन असले की सर्व जातीधर्माला न्याय मिळतो. मराठा समाजालाही भाजप सरकारने आरक्षण दिले होते. त्यापूर्वी राज्यातील आदिवासी गोवारी समजालाही सोयी, सवलती देण्यासाठी भाजप सरकारनेच पुढाकार घेतला. परंतु काही लोकांनी एवढा निष्काळजीपणा केला की जे दिलं होतं तेदेखील त्यांना टिकवता आलं नाही.'

'आता राज्यात पुन्हा भाजप शासन आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या काळात आम्ही पुन्हा आदिवासी गोवारी समाजासह सर्वांनाच पुन्हा न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आदिवासी गोवारी समाजाच्या समस्या आणि प्रश्नांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. आपण यासंदर्भात सरकारमधील नेत्यांकडे पाठपुरावा करणार आहोत,' असे डॉ. फुके म्हणाले.

'काळानुरूप आदिवासी गोवारी समाजाच्या समस्या आणि प्रश्न यात बदल झाला आहे. त्याकडेही आपले लक्ष आहे. समाजाला केवळ जात प्रमाणपत्र देण्यापुरते काम केले जाणार नाही, तर आदिवासी गोवारी समाजाचे अन्य प्रश्न, नोकरी, रोजगार आदी सर्व बाबींवर एकाचवेळी काम करणे गरजेचे आहे,' याकडेही फुकेंनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT