Dr. Parinay Fuke
Dr. Parinay Fuke Sarkarnama
विदर्भ

Parinay Phuke : फुकेंचा होकारच ठरला टर्निंग पॉइंट !

Rajesh Charpe

Nagpur News : माजी मंत्री परिणय फुके यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी दिली आहे. यापूर्वी ते गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फुके हे वन व सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री होते.

त्यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा करण्यात आले होते. निवडणुकीच्यावेळी पराभवाची दाट शक्यता दिसत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना दिलेला होकार हा फुके यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरला आहे.

फुके यांचे कुटंबीय मूळचे काँग्रेसी. राज्याचे माजी अर्थमंत्री डॉ.श्रीकांत जिचकार यांचे ते समर्थक. ते काँग्रेसचे नगरसेवकसुद्धा होते. मात्र काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजीचा त्यांना फटका बसला. नगरसेवक असतानाही काँग्रेसने त्यांना पुन्हा निवडणुकीची संधी नाकारली.त्यामुळे फुके यांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरी केली आणि अपक्ष निवडून आले.

तेव्हापासूनच ते काँग्रेसपासून दुरावले. त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या गटाचे शहरात वर्चस्व होते. या गटाचा नेहमीच फुके यांच्या नावाला विरोध होता. हे बघता काँग्रेसमध्ये फारकाही भविष्य नाही हे त्यांनी हेरले आणि भाजपची वाट धरली. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हेसुद्धा भाजपमध्ये होते आणि भंडारा-गोंदियाचे खासदार होते.

भंडारा-गोंदियात प्रफुल पटेल यांचे वर्चस्व होते. त्यांचे कट्टर समर्थक राजू जैन यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता.जैन यांना पराभूत करण्याचे यापूर्वी भाजपचे सर्व प्रयत्न फसले होते.याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बहुमतसुद्धा नव्हते. अनेकांनी गोंदियातून विधान परिषदेची निवडणूक लढण्यास भाजपला नकार दिला होता.

फडणवीस यांनी फुके यांना विचारणा केली. त्यांनी पराभवाची कुठलीही तमा न बाळगता होकार कळवला आणि फुके यांनी राजू जैन यांना पराभूत करून धक्कादायक विजयाची नोंद केली. जैन यांच्यापेक्षा प्रफुल पटेल यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. निवडणुकीच्या दोन दिवस आधी फडणवीस गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गेले होते आणि सारे चित्रच बदलवून टाकले.

विजयी झाल्यानंतर फुके यांची गाडी जोराने धावायला लागली.प्रथमच आमदार झाले असताना त्यांना राज्यमंत्रीपद देऊन फडणवीस यांनी प्रमोशन दिले. या दरम्यान, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांना भंडारा जिल्ह्यातच पराभूत करण्याचे भाजपने ठरवले होते. विधानसभेच्या निवडणुकीत परिणय फुके यांना त्यांच्या विरोधात उभे करण्यात आले होते.

पटोले आणि फुके यांच्यात अतिशय अटीतटीचा सामना झाला होता. काही वादग्रस्त घडामोडी या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या. याचा फायदा पटोले यांना झाला. फुके यांचा निसटता पराभव झाला. सुमारे दीड वर्षांपूर्वी विधानपरिषदेचा त्यांचा कार्यकाळ संपला होता. आता प्रफुल पटेल आणि जैन महायुतीत सहभागी झाले आहेत. भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून भविष्यात होणारे मतभेद टाळण्यासाठी फुके यांना विधानपरिषदेवर पाठवून सुरक्षित करण्यात आले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT