Chandrapur latest news: चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या विद्यार्थिनींवर दंडाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. चंद्रपुरातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाशी संबंधित या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती करण्यामागील कारण काय आणि या उपक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींचीच निवड का करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
चंद्रपूरचे भाजपचे आमदार तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या विशेष प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना उपस्थित राहण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या गणवेशात यावे, असेही संदेशात नमूद करण्यात आले आहे.
या सूचनेतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे अनुपस्थितीबद्दल देण्यात आलेला दंडाचा इशारा. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्याऐवजी दंडाचा उल्लेख करण्याची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाविद्यालयात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही शिक्षण घेत असताना या कार्यक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींनाच का बोलावण्यात आले, हा आणखी एक प्रश्न विचारला जात आहे. निवडीमागील निकष काय, निर्णय कोणी घेतला आणि त्यामागील नेमका उद्देश काय, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये सार्वजनिक घडामोडी, राजकीय विचार आणि सामाजिक विषयांची माहिती देणारे उपक्रम आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे अनिवार्य करणे आणि गैरहजेरीबद्दल दंडाचा इशारा देणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री दिवंगत शांताराम पोटदुखे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेशी संबंधित महाविद्यालयात हा प्रकार समोर आल्याने त्याचीही चर्चा होत आहे.
“या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्यामुळेच असे संदेश द्यावे लागतात. तीन दिवसांपूर्वी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा स्थानिक आमदार महाविद्यालयात येऊन गेले. त्यानंतर विद्यार्थिनींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले,” असे स्पष्टीकरण शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पूर्णेंदू कार यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.