

Uttar Prasdesh News: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे 2029 च्या लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपनं मोठी रणनीती आखल्याचंही बोललं जात आहे. या निवडणुकीची भाजपकडून 'नो रिस्क' धर्तीवर जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करत प्रभारी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडेंनी उत्तर प्रदेशच्या मतदारसंघात दौरे वाढवले असून आत्तापर्यंत त्यांच्या टीमनं 125 मतदारसंघांचा सर्व्हेही पूर्ण केल्याचं समोर येत आहे. मात्र,याच सर्व्हेमुळे अनेक विद्यमान आमदारांचा उमेदवारीसाठी पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे हे शनिवारी (ता.24) अयोध्येत दाखल झाले आहेत. महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकप्रतिनिधींनी त्यांचं स्वागत केलं. विमानतळावरून ते श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्या धामकडे रवाना झाले. रामलल्लांचे दर्शन आणि पूजन केल्यानंतर तावडे हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बैठकीत जिल्हा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांसोबत संघटनेच्या कामकाजाचा आढावा तसेच आगामी रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेश विधानसबा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी सातत्यानं कंबर कसली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यांचा दौरा सुरू आहेत. तर याचवेळी भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे हे अयोध्येत धडकले आहेत. त्यांच्याकडून विविध जिल्ह्यांमधील पक्षसंघटन स्थितीचा आढावा घेतला जात आहेत.
विनोद तावडेंकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट जाणून घेतला जात आहे. भाजपमधील तावडेंचा संघटनात्मक पातळीवरचा प्रदीर्घ अनुभव, बिहार, हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बजावलेली चोख जबाबदारी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही पक्षासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर भाजपने बिहार (2025) विधानसभा निवडणूक स्पष्ट बहुमताने जिंकली आहे. यापूर्वी 2020 मध्ये त्यांना हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली गेली होती. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद सोपवण्यात आले होते. जिथे त्यांच्या रणनीतीमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसह एनडीएनं दणदणीत विजय मिळवला होता.
या तीनही निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर उत्तर प्रदेशसारख्या एका सर्वात मोठ्या राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी विनोद तावडेंवर सोपवण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून पूर्णपणे फ्री हँड देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या नेतत्वाखाली उत्तर प्रदेशमधील सुमारे 125 मतदारसंघांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचं समोर येत आहे.
मोदी-शाह यांनी उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत ते भाजपबाबत कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांचा कसून शोध सुरू आहे.
विद्यमान आमदारांची गेल्या टर्ममधील कामगिरी, स्थानिक पातळीवरचं पक्षसंघटन, जनसंपर्क, विकासकामं, मतांचं तसेच जातीय समीकरणं, लोकप्रियता, सोशल मीडियाशी असलेला कनेक्ट अशा एक ना अनेक मुद्दयांचा भाजप तसेच तावडेंच्या टीमकडून अगदी सखोलपद्धतीनं अभ्यास, विश्लेषण केलं जात असल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मोदी-शाह तसेच भाजपकडून 'महाराष्ट्र विधानसभा पॅटर्न' लागू होण्याची शक्यता आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात मातब्बर नेत्यांचाही समावेश असणार आहे. तसेच जे नेते भाजपला विजय मिळवू शकतील, अशा स्वपक्षीय व इतर पक्षांतीलही इच्छुक उमेदवार शोधले जात आहेत. यात भाजप नवे चेहेरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री राहिलेल्या चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, दिलीप कांबळे या दिग्गज नेत्यांची तिकिटं कापण्यात आली होती. तसेच तिकीट कापलेल्या तत्कालीन आमदारांच्या यादीत मेधा कुलकर्णी, सुधाकर कोहाळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचाही आमदारांचा समावेश होता.
विनोद तावडे आणि त्यांच्या टीमच्या सर्वेक्षणावर भाजपमधील अनेक इच्छुकांचं आमदारकीचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक राजकीय योगायोग पाहायला मिळत आहे. ज्या तावडेंना भाजपनं 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती. त्याच तावडेंनी दिल्लीत आपल्या कामाची छाप सोडत राज्यसभेची खासदारकी मिळवली. तसेच त्यांच्या हाती आता उत्तर प्रदेशसारख्या एका महत्त्वाच्या राज्यातील अनेक आमदारांच्या उमेदवारीचा निर्णय असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.