Amravati Fraud Case : केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अनुदानासह कर्ज आणि नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी सारिका राऊत हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2026 मध्ये सारिका राऊत निमखेड बाजार परिसरात आली होती. तिने पीएम विश्वकर्मा योजनेतून 50 टक्के अनुदानावर कर्ज, विविध सरकारी लाभ आणि मुलींना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत महिलांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही महिलांना वस्तूंचे वाटप करून विश्वास निर्माण करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली महिलांकडून 25 हजार रुपयांपासून ते एक ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली गेली. या फसवणुकीला अमरावती (Amravati) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो महिला बळी पडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, अनेक महिने उलटूनही कोणालाही कर्ज मंजूर झाले नाही, नोकरी मिळाली नाही आणि भरलेले पैसेही परत करण्यात आले नाहीत. पीडित महिलांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने, "मला फोन करून त्रास देऊ नका, अन्यथा माझ्या जीवाचे बरेवाईट करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन," अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी एकत्र येत अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सारिका राऊत हिला अटक केली. अटक टाळण्यासाठी आरोपीने काही महिलांवर उलट खोटे आरोप करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करत असून, आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे आणि या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.