

Samata Nagari Patsanstha Scam : समता नागरी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात याला राहाता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिर्डी पोलिसांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली.
पोलिस तपासानुसार, काका कोयटे यांच्या अधिपत्याखालील समता नागरी पतसंस्थेच्या शिर्डी (Shirdi) शाखेत अशोक खरातने आपल्या भक्तांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर बँक खाती उघडली होती. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर शासकीय ओळखपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. आतापर्यंतच्या तपासात 57 व्यक्तींच्या नावाने तब्बल 100 खाती उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या बहुतांश खात्यांमध्ये वारसदार म्हणून अशोक खरातचेच नाव नोंदविण्यात आले होते.
या खात्यांद्वारे सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस (Police) तपासातून समोर आला आहे. ही खाती उघडण्यासाठी पतसंस्थेतील काही अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याचा संशय विशेष तपास पथकाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी समता नागरी पतसंस्थेच्या शिर्डी शाखा व्यवस्थापकाविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतसंस्थेच्या कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात मुंबईतील व्यावसायिक दिनेश परब यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अशोक खरात आणि शाखा व्यवस्थापक यांच्या संगनमताने त्यांच्या नावाने खाते उघडण्यात आले आणि त्या खात्यांमधून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले.
तक्रारदाराने आणखी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, खाते उघडताना दाखविण्यात आलेले साक्षीदार त्यांनी कधीही पाहिलेले नाहीत. तसेच खाते उघडण्याच्या अर्जावरील स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित खात्यांमध्ये वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव असून, खात्यांशी जोडलेला मोबाईल क्रमांकही त्याचाच असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिस आता आर्थिक व्यवहारांची साखळी, संबंधित खात्यांचा वापर आणि या कथित गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा सखोल तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.