Washim News, 23 Oct : 'बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यांपासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरून माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही, असे सिध्द होते.' अशी खदखद व्यक्त करत पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील महाराज यांनी राजीनामा देणं हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या.
मात्र, भेटीसाठी वेळ मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी अखेर पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रात लिहिलं की, उद्धव ठाकरे साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र! आपण शिवसेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे प्रमुख नेते म्हणून कार्य करत आहात.
त्याबद्दल सर्वप्रथम महंत या नात्याने आशीर्वाद सोबतच एक शिवसैनिक म्हणून हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा. आपण कोरोना काळातील अतिसंवेदनशील परिस्थितीत केलेली उल्लेखनीय कामगिरीची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. ही बाब सर्व भारतीय आणि खास करुन महाराष्ट्रातील जनतेसाठी गौरवाची आहे.
त्याच बरोबर आपण शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले प्रेम आणि न्याय नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेने आपल्याला कुटुंब प्रमुखाची उपमा दिली. शिवसेना पक्ष बळकट व्हावा म्हणून मी महंत या नात्याने आपणास आशीवार्द सोबतच पक्षाला माझ्या परिने मदत व्हावी म्हणून माझी प्रामाणिक जबाबदारी जाणून मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.
शिवसेना (Shivsena) पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढीसाठी संघटन स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एक वर्षापासून संघटन स्तरावर काम करण्यासाठी आपल्याकडून आदेश आणि सुचनांची वाट पाहत आहे. आपण 9 जुलै 2023 ला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे दर्शनाकरीता आला होता व फेब्रुवारी 2024 ला जनसंवाद यात्रेनिमित्त कारंजा व वाशिम येथे आला.
या दोन भेटी सोडून आतापर्यंत आपली दहा मिनिटांची भेट घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडुन दहा मिनिट भेटीसाठी वेळ दिली जात नाही. त्याबद्दल थोडं शल्य वाटतं आहे. आपल्या व्यस्त कार्यामुळे आपण वेळ देणे शक्य होत नसेल हे सुध्दा मला मान्य आहेत.
मी मागील दहा महिन्यापासून मातोश्री वर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि रवि म्हात्रे यांना संपर्क करत आहे. भेटीसाठी आपणास सुध्दा काही मेसेजेस केले होते, तरी सुध्दा दखल घेतली जात नाहीत. माझ्याकडून पक्षात काही नवीन कार्यकर्त्याला प्रवेशची यादी दिली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशासाठी मला निमंत्रण सुध्दा देण्यात आले नाही.
साहेब मला पक्षाचे कार्य करायचे आहे. पक्षाने मला तिकीट दिलं पाहिजे हा माझा पूर्ण आणि अंतिम उद्देश नाही. पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला काही कटु निर्णय घ्यावे लागतात, हे मी समजू शकतो. परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यांपासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते. म्हणून मी अतिशय जड अंतः करणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.