Hingna By-Election sarkarnama
विदर्भ

Hingna : 'दीर विरुद्ध वहिनी' लढतीत मतदारांची ‘वहिनीं’ना पसंती; हिंगण्यात भाजपने गुलाल उधळला

Hingna By-Election, Rupali Budhe, BJP Victory: हिंगणा नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक १० पोटनिवडणुकीत भाजपच्या रूपाली बुधे यांनी ५३ मतांनी विजय मिळवला. दीर -वहिनीतील रंगतदार लढतीत मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला पसंती दिली.

सरकारनामा ब्यूरो

BJP Victory: हिंगणा नगरपंचायतीच्या पार पडलेल्या वार्ड क्र.१० च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज ( ता.२१) तहसील कार्यालयात पार पडली. भाजपच्या उमेदवार रूपाली अजय बुधे यांनी ५३ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे उमेदवार अल्केश बुधे यांचा पराभव झाला. वहिनी आणि दिरामध्ये लढत होत असल्याने मतदारांचे लक्ष लागून होते. मतदारांनी मात्र वहिनींना पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

हिंगणा नगरपंचायत मधील धनगरपुरा येथील वार्ड क्र. १० चे नेतृत्व अनेक वर्ष नगरसेवक म्हणून स्व. अजय बुधे यांनी केले होते. विकासाच्या बाबतीतही त्यांनी वार्डात सातत्याने कामे केली. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज होती. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांच्या पत्नी रूपाली बुधे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले. त्यांना उमेदवारी द्यावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनीही आग्रह धरला होता. आमदार समीर मेघे यांनी रूपाली बुधे यांच्या नावाला पसंती दर्शविली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अल्केश बुधे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी घेतला. बुधे कुटुंबातच निवडणुकीचे रणांगण जुंपले. दिर विरुद्ध वहिनी असा रंगतदार सामना होईल, असे चित्र उभे करण्यात आले. मतदानाच्या दिवशी ७६ टक्के मतदान झाल्याने अटीतटीचा सामना होईल, असे मतदारांमध्ये बोलले जात होते.

तहसील कार्यालयात रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत एकूण मतदार ४३९ असताना ३३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली. भाजप उमेदवार रूपाली बुधे यांना १९२ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अल्केश बुधे यांना १३९ मते मिळाली. ४ मतदारांनी नोटाला मतदान केले. यामुळे ५३ मतांनी भाजपच्या रूपाली बुधे यांचा विजय झाला. निकाल घोषित होताच तहसील कार्यालयाच्या बाहेरील परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

निवडणुकीची धुरा सांभाळणारे माजी नगरसेवक अजय पारधी यांनी या वार्डात प्रचारासाठी मागील काही दिवसांपासून ठिय्या मांडला होता. विजयानंतर आमदार समीर मेघे तहसील कार्यालय परिसरात दाखल झाले. विजयी उमेदवार रूपाली बुधे यांचे अभिनंदन केले. यानंतर कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. यावेळी भाजप महिला आघाडी अध्यक्ष उज्वला बोढारे, हिंगणा भाजप मंडळ अध्यक्ष प्रमोद डाखळे,माजी नगरसेवक डॉ. अजय पारधी, नगराध्यक्ष लता गौतम, उपाध्यक्ष प्राजक्ता गजबे, नगरसेविका छाया भोसकर, सुचिता चामाटे, बेबी गजबे, दिपाली पुंड, विशाखा लोणारे, जया खाडे, विशाल चामाटे, ज्ञानेश्वर भोसकर, शिरीष देशमुख ,आशीष पुंड, पंकज गजबे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार समीर मेघे म्हणाले, "हिंगणा नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनतेने विकास काम करणाऱ्या भाजपला कौल दिला.माजी नगरसेवक स्व.अजय बुधे यांनी या वार्डात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली. कार्यकर्त्यांना जोडण्याची कला त्यांच्यामध्ये होती. याचा लाभ निवडणुकीत झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या प्रयत्नामुळे भाजपच्या रूपाली बुधे नगरसेवक म्हणून निवडून आल्या. भाजपवर विश्वास दाखविल्याबद्दल मायबाप मतदारांचे आभार".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT