Anil Deshmukh, Ajit Pawar, Prful Patel  Sarkarnama
विदर्भ

NCP News : विकास कामांवरून पटेल यांची अनिल देशमुखांवर टोलेबाजी

Rajesh Charpe

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना प्रफुल पटेल आणि अनिल देशमुख एकमेकांवर टीकाटिपणी करणे टाळत होते. आता मात्र दोघांची भूमिका बदलली आहे. शनिवारी काटोलमध्ये जाऊन प्रफुल पटेल यांनी देशमुखांच्या नावाचा उल्लेख टाळून काटोल-नरखडेचा विकास का झाला नाही? असा सवाल उपस्थित केला. अजित पवार यांच्यासमोरच परिवर्तन आवश्यक असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्याय सन्मान यात्रेचा कार्यक्रम अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणातून काटोलच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सुमारे पंचेवीस वर्षांपासून एकच लोकप्रितनिधी येथे निवडून येत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रितनिधीला नेहमीच झुकते माप दिले. सातत्याने मंत्रिमंडळात ठेवले, असे असताना काटोलचा अपेक्षित विकास झाला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार उपलब्ध नाही. एकही उद्योग इतक्या वर्षांत येते आला नाही. सर्वाधिक संत्रा पिकवणारा हा मतदारसंघ आहे. मात्र, संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योगही येथे विकसित झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता परिवर्तन आवश्यक आहे. त्याशिवाय काटोल-नरखेडचा विकास होणार नाही, असे पटेल यांनी अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख न करता सांगितले.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ शेतीप्रधान आहे. संत्रा, कापूस, सोयाबीन येथे मोठ्या प्रमाणात पिकते. त्यामुळे या मतदारसंघाच्या नागरिकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. या सर्व समस्या व मागण्यांकडे प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.

पटेल यांनी आपल्या भाषणात कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा संपूर्ण रोख अनिल देशमुख यांच्याकडे होता. परिवर्तनाची गरज असल्याचे सांगून त्यांनी देशमुखांना पराभूत करण्यासाठी सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT