MVA & VBA Letter Sarkarnama
विदर्भ

Maha Vikas Aghadi Parties : अखेर ‘वंचित’ला महाविकास आघाडीकडून निमंत्रण, पण...

Mahavikas Aghadi : जागावाटपावरील चर्चेसाठी बोलावले; आंबेडकरांनीही दिले पत्रातून उत्तर

जयेश विनायकराव गावंडे

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होण्यावर सध्या चर्चा सुरू असताना तीनही पक्षाच्यावतीने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला अखेर निमंत्रण पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊन लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून होणाऱ्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने सहभागी व्हावे, अशा आशयाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्याला प्रकाश आंबेडकर यांनी उत्तरही दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही, यावरून तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये करावा, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर सातत्याने मांडत आहेत. आंबेडकर यांनी अमरावती येथील सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. Maha Vikas Aghadi Parties

अमरावती येथील सभेत आंबेडकर यांनी ‘वंचित’ला सोबत न घेतल्यास काँग्रेस नेते तुरुंगात जाण्याचा सूचक इशारा दिला होता. अखेर महाविकास आघाडीकडून ‘वंचित’ गुरुवारी (ता. 25) निमंत्रण पाठविण्यात आले आहे. निमंत्रणावर महाविकास आघाडीतील तीनही घटकपक्षातील नेत्यांच्या सह्या आहेत. आपण बैठकीला आपल्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना पाठवावे, असे पत्रात म्हटले आहे.

‘वंचित’कडून पत्र मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीची बैठक ही गुरुवारीच होणार आहे. बैठकीला जायचे की नाही, याबाबत पक्षात चर्चा करण्यात येणार आहे. ‘वंचित’च्या या पत्राला प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे. ‘आम्ही कोणताही संकोच न करता बैठकीला उपस्थित राहू,’ असे आंबेडकर यांनी पत्राला उत्तर देताना नमूद केले आहे, परंतु तसे म्हणताना त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या जागावाटपाविषयी महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील. ‘वंचित’च्या प्रवेशाविषयी हरकत नाही. पण लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे ‘वंचित’च्या प्रवेशाचा निर्णय जाहीर झाला नसल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली होती. त्यावरही आंबेडकर यांनी प्रश्न विचारला आहे.

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी बुद्धीशी खेळ खेळत आहात. तुमच्या मेंदूमध्ये कदाचित ‘लोचा’ आहे असे दिसते. महाराष्ट्राचे अखिल भारतीय प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23 जानेवारीला काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत निवडणूक जाहीर झाल्यावर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समाविष्ट केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. अशात तुम्ही स्वतःच्या स्वाक्षरीचे निमंत्रण पाठवत आहात. पत्रातील इतर दोन स्वाक्षरीकर्त्यांनी, माझ्या अनेक बैठकींमध्ये माझ्याशी संक्षिप्तपणे आणि स्पष्टपणे सामायिक केले आहे की. काँग्रेस हायकमांडने तुम्हाला महाराष्ट्रात युती आणि युतीशी संबंधित निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत.’

आंबेडकर पुढे म्हणतात की, ‘शिवसेनेसोबतच्या बैठकींमध्ये मला सांगण्यात आले आहे की, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही पक्ष राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी थेट पत्रव्यवहार करतात. त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने ते तुम्हाला कळवित नाहीत. एआयसीसी किंवा काँग्रेस हायकमांडने तुम्हाला महाराष्ट्रात युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे का?’ असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात केला आहे.

‘औरंगाबाद येथे पत्रकारपरिषदेत आमचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीबाबत कोणत्याही निमंत्रणावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वाक्षरी असावी. अशा स्वाक्षरी असलेले पत्र पाठवा. कोणताही किंतु-परंतु मनात न ठेवता आम्ही बैठकीला उपस्थित राहू.’

काँग्रेसने काय म्हटले पत्रात?

देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाहीविरोधात खंबीरपणे आवाज उठवित आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे होणाऱ्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. ‘वंचित’तर्फे महत्त्वाचे नेते आपण बैठकीसाठी पाठवावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनानेते खासदार संजय राऊत यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रात नमूद आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT