Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Akola Lok Sabha Election Result : प्रकाश आंबेडकर अकोल्यात कुणाचा 'GAME' करणार?

सरकारनामा ब्यूरो

Vidarbha Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे आता केवळ राजकीय पक्षांना नव्हे तर सर्व सामान्य जनतेलाही निकालाची प्रचंड उत्सुकता आहे.

राज्यात नेमकं कोणाचं पारडं भारी ठरणार महायुती की महाविकास आघाडी?, देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी? यासह आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण असणार? हे अशा अनेक प्रश्नांची उत्तर सर्वांनाच जाणून घ्यायची आहे.

राज्यातही अनेक मतदारसंघांमध्ये अटतटीची लढत झालेली आहे. काही ठिकाणी दोघांमध्ये थेट तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळाले.

विदर्भात तिरंगी लढतीची सर्वाधिक उत्सुकता लागून आहे, ती अकोला लोकसभा मतदारसंघात. कारण, येथे भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Alliance) यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. जो उमेदवार जिंकेल त्याचे मताधिक्य फारच कमी असण्याची शक्यता आहे.

1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे भाऊसाहेब फुंडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट सामना झाला होता. काँग्रेसने आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना 50 टक्के तर फुंडकर यांना 45.05 टक्के मते मिळाली होती. 32782 मतांनी आंबेडकर विजयी झाले होते.

1999 मध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बमसं यांच्यात तिरंगी सामना झाला. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली होती. दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाल्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) अवघ्या 8716 मतांनी विजयी झाले होते. 2024 मध्येही जवळपास 1999 सारखीच स्थिती आहे.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मतांचे विभाजन झाल्यास 'वंचित'ला फायदा होऊ शकतो. कारण, भाजप (BJP) आणि काँग्रेसचे उमेदवार मराठा पाटील समाजाचे आहेत. विद्यमान खासदार संजय धोत्रे आजारी असल्याने त्यांचे पुत्र अनुप मैदानात आहेत तर काँग्रेसने अभय पाटील यांच्या रूपाने सक्षम उमेदवार मैदानात उतरविला आहे.

काँग्रेस पक्षाच्या विजयात नेहमीच एससी आणि मुस्लिम मतदारांचा मोठा हातभार असतो. या निवडणुकीत आंबेडकर मैदानात असल्याने एससी आणि बहुजन समाजाची मते त्यांच्याकडे वळली आणि मुस्लिमांनी काँग्रेसच्या पारड्यात मते टाकली तर भाजपचे अनुप धोत्रे यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT