Pratibha Dhanorkar, Ajit Pawar and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Pratibha Dhanorkar News : कॉंग्रेसच्या दिवंगत खासदाराचे कार्यालय राष्ट्रवादीच्या नावे, फुटीनंतर ताबा कुणाचा?

NCP : आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार अशी फूट झाली.

प्रमोद काकडे

MLA Pratibha Dhanorkar on NCP's split in the Nationalist Congress : दिवंगत खासदार बाळू धानोरकर हयात असताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावाने स्वतःचे कार्यालय लावून दिले. आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार अशी फूट झाली. चंद्रपुरातील या कार्यालयावर अद्याप शरद पवार गटाचा ताबा आहे. भविष्यात कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच होऊ शकते. (There may be a tug of war in the NCP over ownership rights)

पवार आणि धानोरकर कुटुंबीयांचे अत्यंत जिव्हाळ्याचे सबंध होते. राष्ट्रवादीतील फूट वेदनादायी आहे. याचा स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी खंत आमदार प्रतिभा धानोरकर या घडामोडीवर व्यक्त केली. पवार आणि धानोरकर कुटुंबीयांचे स्नेहबंध २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जुळले. बाळू धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेची उमेदवारी देण्याचे त्यांना आश्वासन दिले. मात्र कॉंग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारीचे आश्वासन देणारे राज्यातील नेतेही हतबल झाले. आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे धानोरकरांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसमध्ये चंद्रपूर लोकसभा उमेदवारांच्या नावाचा घोळ सुरू होता.

आधी नागपुरातील विशाल मुत्तेमवार आणि त्यानंतर विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये जळगाव-बुलढाणा जिल्ह्यातील रावेर मतदार संघाचा वाद सुरू होता. धानोरकर निवडून येऊ शकतात, असा विश्वास जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना होता. त्यांनी धानोरकरांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एक शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले.

पवारांना चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जातीय आणि सामाजिक समीकरणाची माहिती होती. त्यांनी रावेर ऐवजी चंद्रपूर लोकसभा राष्ट्रवादीकडे घेण्याचा निश्चय केला. शरद पवारांनी थेट राहुल गांधीशी भ्रमणध्नीवर संपर्क साधला. रावेरच्या बदल्यात चंद्रपूर लोकसभेचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा राहुल गांधींनी तुमचा उमेदवार कोण असेल, अशी विचारणा केले. पवारांनी बाळू धानोरकरांने नाव घेतले.

आणि इतिहास घडला..

शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देवून ते तुमच्या पक्षात आले. परंतु तुम्ही उमेदवारी नाकारत आहात,असे निदर्शनास आणून दिले. शिवसेनेच्या आमदाराने राजीनामा देवून लोकसभेच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. याची माहितीची तोपर्यंत गांधी कुटुंबीयांना नव्हती. असा विश्वासघात झाला तर पक्षात कुणी येणार नाही, असेही पवारांनी गांधींना सांगितले. त्यानंतर कॉंग्रेसची उमेदवारी बाळू धानोरकर यांना देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आणि पुढचा इतिहास घडला.

मोदी लाटेत झाले होते खासदार..

मोदी लाटेत राज्यात एकमेव कॉंग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आले. धानोरकर जाहीर सभांमध्ये शरद पवार यांचे आभार मानायचे. त्यांच्यामुळे आपणास उमेदवारी मिळाली, असे सांगायचे. शरद पवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचे आदरातिथ्य खासदार धानोरकर यांनीच केले. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार म्हणून निवडून आल्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.

बाळू धानोरकरांनी शब्द पूर्ण केला..

खासदार-आमदार धानोरकर पती-पत्नीचे पवार कुटुंबीयांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. महाविकास आघाडीत अजित पवार उपमुख्यमंत्री असताना चंद्रपुरात आले. तेव्हा धानोरकरांनी तुमच्या पक्षाला कार्यालय नाही. शिवसेनेचे जिल्हा कार्यालय स्वतःच्या मालकीचे आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावावर लावून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी शब्द पूर्ण केला. जवळपास ८० लाख रुपये बाजारभाव असलेले हे कार्यालय आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे.

अद्याप कुणाचाही दावा नाही..

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अद्याप कोणत्याच गटाने या कार्यालयावर दावा ठोकलेला नाही. बहुतांश पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने उभे आहे. धानोरकरांच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या सात्वंनासाठी खुद्द अजित पवार वरोरा येथे आले होते. खासदार धानोरकर हयात असते तर ही फूट त्यांच्यासाठी सुद्धा अनाकलनीय आणि वेदनादायी ठरली असती, असे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

पवार कुटुंबातील फूट वेदनादायी..

पवार कुटुंबात झालेली फूट वेदनादायी आहे. आमचे पवार कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. राष्ट्रवादी (NCP) घडलेल्या या प्रसंगावर काय बोलावे हेच कळत नाही. मोठे साहेब, (Sharad Pawar) दादा आणि सुप्रियाताई आमच्यासाठी आदरणीय आहे, असेही आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) म्हणाल्या.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT