Lok Sabha Election 2024 : नव्या वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उपराजधानी नागपूर येथून महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. गुरुवारी (28 डिसेंबर) ही सभा होणार आहे. महारॅलीच्या सभास्थळावर सध्या जय्यत तयारी सुरू आहे. नागपुरात जेथे महारॅली आयोजित करण्यात आली आहे, ज्या जागेला 'भारत जोडो मैदान' असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेतून प्रेरणा घेत हे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महारॅलीसाठी काँग्रेसने घोषवाक्यही तयार केले आहे. 'है तय्यार हम' असे हे घोषवाक्य राहणार आहे. राज्याच्या ज्या जिल्ह्यांमधून काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन वाहने येतील, त्या प्रत्येक गाडीवर पक्षाचे ध्वज आणि 'है तय्यार हम' या घोषवाक्याचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. गुरुवारी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. याच दिवशी दुपारी दोन वाजतापासून महारॅलीला सुरुवात होणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते नागपुरातील महारॅलीत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील ही रॅली होत आहे. पटोले ज्या विदर्भातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात, त्याच भागात महारॅली होत असल्याने त्यांनी व्यक्तीश: तयारीत लक्ष घातले आहे.
पटोले यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील विदर्भातील आहेत. त्यामुळे त्यांनीही महारॅली यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महारॅलीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. दोनच दिवसांवर महारॅलीचा कार्यक्रम आला असल्याने आता जिल्हा, तालुका आणि बुथनिहाय तयारीने प्रत्येक जिल्ह्यात वेग घेतला आहे. महारॅलीत किमान दहा लाखांची उपस्थिती दिसावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीत डिसेंबर 1920 मध्ये नागपूरच्या भूमीतूनच महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. नागपूरमधूनच 1959 मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. त्यामुळे काँग्रेस आणि नागपूरचे जुने नाते आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा 138 वा स्थापन दिन नागपुरात साजरा होत असल्याने त्याबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आमदार अभिजित वंजारी, आमदार डॉ. नितीन राऊत, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी आमदार सतीश चतुर्वेदी, प्रवक्ते अतुल लोंढे, वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे देखील महारॅलीच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.