Chandrapur MIDC : एमआयडीसीच्या निर्मितीसाठी सुमारे 40 वर्षांपूर्वी 35 एकर जमीन घेतली गेली. आज ना उद्या या माध्यमातून रोजगाराची निर्मितीर्मीती होईल. त्यातून आपले भले होईल,अशी आशा परिसरातील तरूणांना होती. पण अद्यापही येथे ना उद्योग आले ना रोजगार मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मूळ गाव. आता एमआयडीसी व विजय वडेट्टीवार यांचा संदर्भ घेत भारत राष्ट्र समिती (BRS) मैदानात उतरली आहे.
चंद्रपूर हा औघोगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण जिल्ह्यातील काही भाग सोडला तर येथे उद्योगाची वानवा आहे. येथील कामगार कामासाठी मोठ्या प्रमाणावर तेलंगणात जातात. अलीकडे तर स्थलांतरांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी हे मुख्य मार्गावरील पाच हजार लोकसंख्येचे गाव. सुमारे 40 वर्षांपूर्वी याठिकाणी एमआयडीसीला मंजुरी मिळाली होता. याकरिता गावालगत 35 एकर शेती घेण्यात आली. काम होऊन त्यातून रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल, असे अनेकांना वाटत होते. पण आता 40 वर्ष लोटले पण केवळ रस्ता बनविण्यापलीकडे येथे काहीच काम झालेले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्या शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठी आपली जमिन कमी किमतीत विकल्या.ते आता आक्रमक झाले आहेत. एकतर एमआयडीसीतून रोजगाराच्या संधी द्या, अथवा आमची जमिन आम्हाला परत करा, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. काही शेतकरी तर आता या जागेवर शेती करू लागले आहेत. करंजी हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील करंजीचे सरपंच होते. वडेट्टीवारांचे प्राथमिक शिक्षण याच भागात झाले आहे. अजूनही विजय वडेट्टीवार यांची गावाशी नाळ जुळलेली आहे.
आता विजय वडेट्टीवारांच्या गावात एमआयडीसी झालेली दैना बघता महाराष्ट्रात आलेली बीआरएस हा मुद्दा घेत मैदानात उतरली आहे. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात बीआरसचे नेते भूषण फुसे यांनी 40 वर्षे लोटून काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या गावातीलच प्रकल्प पूर्ण होत नसतील, तर काय म्हणावे असे सांगत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी हे गाव राजुरा विधानसभा मतदारसंघात मोडते. चार तालुक्यांचा समावेश असलेल्या राजुरा मतदारसंघातील शिलेदारांनी जिवती व गोंडपिपरी या तालुक्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेहमीच होत आला आहे. येथे रोजगाराचा प्रश्न हा गंभीर आहे. तरूणांच्या हाताना काम नाही. तीन मोठ्या नद्या असताना सत्ताधाऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण करता आली नाही. त्यामुळे एमआयडीसी होणार की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे.