Protest of Congress In Amravati Sarkarnama
विदर्भ

Amravati Congress : काम थांबल्यानं वरुडात संतापाचे वारे; आमदार कमिशनखोर असल्याचे काँग्रेसचे नारे

Amar Ghatare

Blame the MLA : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं अमरावती जिल्ह्यात असलेल्या वरुड तालुक्यातील पंढरी प्रकल्प ३५ गाव पाणीपुरवठा योजनेचं काम थांबविल्यानं काँग्रेस चांगलीच भडकलीय. शुक्रवारी (ता. १०) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं. या वेळी ‘कमिशनखोर आमदाराचा निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आल्यानं संबंधित आमदार कोण, या चर्चेला राजकीय वर्तुळात सुरुवात झालीय.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात पंढरी प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत ३५ गाव पाणी पुरवठा योजनेला सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी शासनानं १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीपैकी ५० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत योजनेवर झालाय. अनेक भागांमध्ये रस्ते खोदण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यासाठी गावांमध्ये खड्डेही खणण्यात आलेय. परंतु योजनेचं काम अर्ध्यावर आलं असताना अचानक कंत्राटदारानं ते थांबवलं. (Protest of Congress in Amravati MGP office for Water Supply Scheme Blame's MLA from District for Commission)

अनेक दिवसांपासून कामच होत नसल्यानं तालुक्यातील ग्रामीण जनता अस्वस्थ झाली. त्यांनी राजकीय मंडळींचं याकडं लक्ष वेधण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे नेते विक्रम ठाकरे यांनी कंत्राटदाराशी संपर्क केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानं काम थांबविण्यात आल्याचं त्यानं स्पष्ट केलं. त्यामुळं ठाकरे यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडं विचारणा केली. अधिकाऱ्यांनी कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळं शुक्रवारी ठाकरे आपल्या समर्थकांसह जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात धडकले.

प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित आमदार यांच्या विरोधात अभियंत्यांच्या कक्षात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील एका आमदाराचा उल्लेख काँग्रेसनं कमिशनखोर असा केल्यानं हा लोकप्रतिनिधी कोण, अशा चर्चेला सुरुवात झाली. दिवाळीला सुरुवात झाल्यानं जीवन प्राधिकरण विभागातील अनेक अधिकारी सुटीवर जाण्याच्या बेतात असताना हे आंदोलन सुरू झालय. पाणीपुरवठा योजनेचे लाभार्थी गावांचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्यही या आंदोलनात सहभागी झालेय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलकांनी जीवन प्राधिकरणाऱ्या कार्यालयातच ठिय्या दिलाय. आता जोपर्यंत योजनेचं काम सुरू होत नाही, तोपर्यंत कक्षातून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतलीय. त्यामुळं जीवन प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांच्या दिवाळीवर आंदोलनाचं संकट घोंघावतय. योजनेच्या कामाला दोन आठवड्यांत सुरुवात न झाल्यास जनतेसह आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही काँग्रेसनं दिलाय. त्यामुळं ऐन हिवाळ्यात अमरावती जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटल्याचं पाहायला मिळत आहे. आता या पाणीपुरवठा योजनेबाबत जीवन प्राधिकरण विभाग कोणता तोडगा काढते याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. तूतार्स अधिकाऱ्यांनी पंढरी प्रकल्पाच्या मुद्द्यावर मौन बाळगलय.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT