MLC Election Update 2026 : विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत दबावाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. पुण्यात शिवसेनेकडून चिवटे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. चिवटे यांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल केल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांकडूनच संभाव्य बंडखोरीचे संकेत मिळत असल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने (BJP) कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. पण एकनाथ शिंदे यांनीही मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून भाजपने अमरावती शिक्षक मतदारसंघात प्लॅन बी तयार ठेवल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात उमेदवारीचा तिढा कायम असल्याने भाजपने अमरावती शिक्षक मतदारसंघ उमेदवारीचा मुद्दा पुढे केला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक यांची उमेदवारी अंतिम मानले जाते. पण जर शिवसेनेने पुण्यात शेवटच्या क्षणी मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिलीच तर अमरावतीत भाजपकडूनही स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता वाढली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्या नावांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांनीही पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले असून त्यांचे एबी फॉर्मही तयार आहेत. शेवटच्या क्षणी दोघांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे चिवटे यांनी पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजप अमरावतीत नेमका कोणता चेहरा मैदानात उतरवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.