Rajendra Mulak1 Sarkarnama
विदर्भ

Rajendra Mulak : काँग्रेस नेत्याचं 'इकडं आड, तिकडं विहीर', अशी स्थिती; महाविकास आघाडी काय करणार?

Rajesh Charpe

Nagpur Politics News : महाविकास आघाडीने नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक कुंचबना काँग्रेसची झाली आहे. रामटेक लोकसभाची जागा सोडताना शिवसेना ठाकरे पक्षाने रामटेक विधानसभेची जागा मागितली होती. काही प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत यास होकार देण्यात आला होता. ही बाबा आता समोर येऊ लागल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

राजेंद्र मुळक 15 वर्षांपूर्वी उमरेडचे आमदार होते. त्यानंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हापासून ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. मधली 6 वर्षे ते विधान परिषदेवर होते. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. मागील 10 वर्षांपासून त्यांनी आपला संपूर्ण फोकस रामटेक विधानसभा मतदारसंघावर केला आहे. रोज ते मतदारसंघात जात आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. ते कामालाही लागले होते.

मात्र काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत कोणाचे काही खरे नसले, याची प्रचिती मुळक यांना आली. थेट दिल्लीतून हालचाली झाल्या आणि उदय यादव यांना उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेस आणि भाजपच्या (BJP) राजीनाराजीत आमदार आशिष जयस्वाल निवडून आले. ते शिवसैनिक असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत.

महाविकास आघाडीचाच प्रयोग

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. विदर्भात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. भाजपला रोखण्याचा विश्वास निर्माण झाल्याने विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर नागपूर जिल्ह्यातील सर्व जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सोबत लढल्या आहेत. यात आता शिवसेनेची भर पडली आहे.

शिवसेनेचा निर्धार

भाजपसोबत युती असताना शिवसेना रामटेक आणि काटोल या दोन विधानसभेत लढत होती. रामटेकवगळता शिवसेनेला काटोल आजवर कधीच जिंकता आले नाही. त्यामुळे रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा पहिला दावा आहे. रामटेक सोडणार नाही हे आधीच शिवसेनेने जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे मुळक यांच्यावर पुन्हा दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ येऊ शकते.

या पर्यायाची चाचपणी

काटोलमध्ये अनिल देशमुख आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेना दावा करणार नाही हे ठरले आहे. या बदल्यात हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेसाठी सोडावा लागू शकतो. हे बघता आता मुळक यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात लढणे हाच पर्याय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT