Rajendra Mulak, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Rajendra Mulak : माजीमंत्री राजेंद्र मुळकांच्या बंडाने रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाढली चिंता!

Ramtek Assembly Constituency 2024 : त्यामुळे दहा वर्षांपासून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या मुळकांचा संयम संपला.

Rajesh Charpe

Rajendra Mulak and Shivsena UBT News: नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चिंता वाढली आहे.

रामटेक विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने (Congress) दावा केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने रामटेक सोडण्यास नकार दिला. हा मतदारसंघ सोडावा आणि राजेंद्र मुळक यांना उमेदवारी द्यावी यासाठी शेवटपर्यंत नेत्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. परंतु काँग्रेसला यात यश आले नाही. शेवटी राजेंद्र मुळक यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सोबत होते. बर्वे हे जिल्ह्याचे काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांचे कट्टर समर्थक आहेत. हे बघता रामटेकमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात अधिकृत बंड पुकारल्याचे दिसून येते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये ज्या वाटाघाटी सुरू होत्या, त्यावरून मुळक यांच्यासाठी उद्धव ठाकरे राजी होतील अशी आशा व्यक्त केली जात होती. स्वतः मुळक हे सुद्धा आशेवर होते.

काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत काहीही होऊ शकते असे त्यांचे म्हणणे होते. राजेंद्र मुळक हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे आहेत. ते मुख्यमंत्री असताना मुळक अर्थराज्यमंत्री होते. सर्वप्रथम मुळक हे उमरेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

त्यानंतर झालेल्या पुनर्चनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. नंतर मुळक हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढले होते. मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी रामटेक मतदारसंघाची निवड केली. दहा वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसची बांधणी केली.

2019च्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. यावेळेस काँग्रेस संधी देईल अशी आशा त्यांना होती. मात्र महाविकास आघाडीमुळे उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे दहा वर्षांपासून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या मुळकांचा संयम संपला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT