Rohit Pawar-Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Rohit Pawar : ‘राजसाहेब, तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते...तेवढं फक्त होऊ देऊ नका’; रोहित पवारांची ठाकरेंना विनंती

Vijaykumar Dudhale

Nagpur, 26 August : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना माझी विनंती आहे, भाजप एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाची मतं कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. तुमचा तसा वापर होऊ नये. तुम्ही मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहात, त्यामुळे भाजप तुमचा फक्त मतं खाण्यासाठी वापर करून घेईल, ते फक्त होऊ देऊ नका, एवढी विनंती, अशा शब्दांत राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत रोहित पवार यांनी भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या विदर्भ दौऱ्यावर आमदार पवार यांनी मार्मिक शब्दांत टिपण्णी केली.

रोहित पवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नागपुरात येऊन भेट घेतली. माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामांबाबत गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. माझ्या मतदारसंघातून दोन राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्याबाबतही गडकरी यांच्याशी चर्चा झाली. ते नेहमी मदत करतात असतात. विरोधी पक्षातील लोकांनाही ते मदत करतात.

राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे हे कधी भाजप विरोधात, तर कधी त्यांच्या बाजूने बोलतात. कधी पवार साहेबांच्या बाजूने, तर कधी विरोधात बोलतात. त्यांची भूमिका नेहमी बदलत राहिली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे.

एक नाशिकची महापालिका त्यांच्याकडे होती. यावरूनच असं दिसतं की त्यांच्यावरची विश्वासार्हता कुठेतरी कमी होत चालली आहे. ते आज पवारांबद्दल बोलत आहे. काही दिवसांपूर्वी मोदींबद्दल बोलत होते.

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावरून रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘भाजप कशाचं आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांना कळत नाही. वरुन आदेश आला की हे इथे नाचत बसायचं.

राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाहीत आणि हे काल्पनिक विषय काढून आंदोलन करत आहेत. कोणतं तरी काल्पनिक प्रकरण काढून आणि त्यावर आंदोलन करतात. हे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कळत नाही की कुठे आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही ते, असे रोहित पवार यांनी नमूद केले.

कंगना रानोट या कलाकार आहेत. त्यांना राजकारणाचं काय माहीत. त्या सध्या खासदार झाल्या आहेत. ज्या विषयी आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल तुम्ही कसे बोलू शकता. मी कंगना रानोट यांच्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि सरकार, भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करतो, असेही रोहित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT