Devendra Bhuyar-Raju Shetty  Sarkarnama
विदर्भ

राजू शेट्टींचा दे धक्का! आपल्याच एकमेव आमदाराला दाखवला बाहेरचा रस्ता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी त्यांच्याच आमदाराला धक्का दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी त्यांचेच एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना धक्का दिला आहे. शेट्टी यांनी भुयार यांची हकालपट्टी केली आहे. यामुळे शेट्टी विरुद्ध भुयार असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. यातून स्वाभिमानीत फूट पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (Raju Shetty News)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे एकमेव आमदार आहेत. संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी भुयार यांची हकालपट्टी केली आहे. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला, अशी टीकाही शेट्टींनी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भुयार यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यावेळी एका आमदाराला मंत्रिपद मिळावे यासाठी शेट्टी यांनी आग्रह धरला होता. भुयार यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील इतर नेत्यांमध्ये खटके उडत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला भुयार हे खिशाला लावत नसल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता.

हिवरखेड येथे शेट्टींची सभा होणार होती. तिथे कार्यकर्त्यांनी भुयार यांच्या विरोधात बॅनर लावले होते. भुयार यांच्या हकालपट्टीची मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने शेट्टींनी यावर विचार करण्याची भूमिक घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात भुयार यांनी सहभाग घेतला नव्हता. अखेर शेट्टी यांनी भुयार यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

भुयार हे निवडून आल्यापासूनच संघटनेत सक्रीय नसल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर सोशल मीडियातही त्यांनी स्वाभिमानीपासून फारकत घेतल्याचे दिसत होते. स्वाभिमानीच्या आंदोलनांमध्येही ते दिसत नव्हते. याबाबत खुद्द राजू शेट्टी यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भुयार यांनी राष्ट्रवादीला अधिक जवळ केल्याचे मागील वर्षीपासून दिसू लागले आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अमरावतीत पार पडलेल्या परिवार संवाद यात्रेत भुयारही सहभागी झाले होते. व्यासपीठावरील त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी पाटील यांनीही भुयार आमचेच आहेत, असे म्हणत एकप्रकारे शेट्टी यांनाच आव्हान दिले होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT