चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा सभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली होती. आजही येथील निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोप केलेले जे मतदारसंघ आहेत त्यात या मतदारसंघाचा समावेश आहे.
बाहेरच्या मतदारसंघातून आलेले भाजपचे देवराव भोंगळे येथून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे सुभाष धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप यांचा धक्कादायक पराभव केला. या दोन्ही पराभूतांनी या मतदारसंघातील मतदार याद्यांचा घोळा उकरून काढला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
आता भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी धोटे आणि चटप यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत आपआपले पक्ष आणि पक्षचिन्ह फ्रिज करून भाजपला रोखण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीचे प्रयत्न फलद्रूप झाल्यास आधीच दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेला काँग्रेसचा पंजा या निवडणुकीत दिसणार नाही.
राजुरा मतदारसंघात शेतकरी संघटनेची ताकद मोठी आहे. याच ताकदीच्या भरवशावर वामनराव चटप यापूर्वी येथून निवडून आले होते. २०२४च्या निवडणुकीत त्यांनी लक्षणीय मते घेतली होती. काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी सुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दोघांचीही मते एकत्र आल्यास नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मनसुबे उधळून लावता येऊ शकते. हाच विचार सध्या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू आहे. याबाबत त्यांच्या प्राथमिक चर्चासुद्धा झाली आहे.
नगराध्यक्षपद काँग्रेसला द्यायचे आणि उर्वरित जागा शेतकरी संघटनेने लढवायच्या असे सूत्र ठरवल्या जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार राहतील. मात्र आघाडी करताना काँग्रेसला मात्र आपले पंजा चिन्ह गोठवावे लागणार आहे. हीच सर्वात मोठी अडचण काँग्रेसची आहे. याला वरिष्ठ नेते संमती देण्याची शक्यता दिसत नाही.
शहर विकास आघाडीच्या स्थापनेला शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी दुजोरा दिला. याबाबत आमची चर्चा व्हायची आहे. जेव्हा ती होईल तेव्हा निवडणूक कुठल्या चिन्हावर लढायची याचा निर्णय आम्ही घेऊ. सुभाष धोटे म्हणाले, याबाबत दुसऱ्या फळीतील नेत्यांची चर्चा झाली आहे. पंजा गोठवण्यासाठी आम्हाला वरिष्ठ नेत्यांची परवानगी घ्यावी लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.