Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी सोमवारी निवडणुकीची घोषणा झाली. यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. सध्या या 6 पैकी 3 जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून, विरोधकांच्या मविआतील घटकपक्षांकडेही 3 जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यसभेच्या यंदा रिक्त होणाऱ्या 15 राज्यांतील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल. मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होईल. असे असले तरी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जातीय समिकरणावर जोर राहणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागा यंदा रिक्त होणार आहेत. यात सत्ताधारी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या भाजपच्या 3 नेत्यांच्या जागांचा समावेश आहे.
याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याही जागा यंदा रिक्त होणार आहे. आता या 6 जागांवर हे नेते पुन्हा निवडून जाणार की पक्ष इतर कोणत्या नेत्यांना संधी देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काय होणार? भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेच्या मैदानावर उतरवणार, हे पाहणेही या प्रकरणी महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तर 2 राज्यांतील 6 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपणार आहे. ही निवडणूक होणाऱ्या राज्यांत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा व हिमाचल प्रदेशाचा समावेश आहे. देशातील राज्यसभेच्या 56 जागांच्या निवडणुकीची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्र राज्यातील 6 जागांचा समावेश आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपच्या प्रत्येकी तीन जागांचा समावेश आहे. संख्याबळ आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघता भाजपाचाच या निवडणुकीत वरचष्मा राहणार आहे. असे असले तरी भाजपमधील नेत्यांना उमेदवारी देत राज्यसभेत संख्याबळ वाढविते की, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्राधान्य देत त्यांना खुश करते, ही येणारी वेळच सांगेल. मात्र या निवडणुकीत प्रत्येकच पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करेल, यात तिळमात्र शंका नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
घोडेबाजाराला येणार उत..
कुठलीही निवडणूक म्हटली की, घोडेबाजार हा आलाच. हा गेल्या अनेक वर्षांचा प्रत्येकाचा अनुभव आहे. त्यात राज्यसभा आणि विधानपरिषदेत सर्वाधिक घोडेबाजार होतो. हीदेखील काळ्या दगडावरची रेष आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यंदा तर भाजपा, त्यांचे मित्र पक्ष आणि शिवसेना उबाठा ते त्यांचे मित्र पक्ष यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे 6 जागा पदरात पाडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. साम, दाम, दंड, भेद अश्या चहू बाजूंनी खेळी करावी लागणार असल्याने घोडेबाजाराला प्रचंड उत येण्याची चिन्हे आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.