Shiv Sena : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पुन्हा एकदा विदर्भाकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने ठाकरे गटाने आता विदर्भातून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी रश्मी ठाकरे यांचा कार्यक्रम घोषित होताच त्याचा चांगलाच धसका शिवसेना एकनाथ शिंदे गटाने घेतल्याचे दिसत आहे.
शिंदे गटाने ठाकरे गटाचा कित्ता गिरवीत विदर्भात संघटनवाढीसाठी महिला नेत्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामध्ये खासदार भावना गवळींसह अनेकांना स्थान देण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला सेनेच्या विभागीय नेत्या व विभागीय संपर्क नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पूर्व व पश्चिम विदर्भ नेत्या या पदावर खासदार भावना गवळी यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या गवळी यांना जिथे एखाद्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी पुढे करणे किंवा संघटनेचा विचार केल्यास राज्याचे नेतेपद मिळणे अपेक्षित होते, तिथे त्यांना केवळ महिला विंगच्या विभागीय पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भावना गवळींचे हे 'प्रमोशन' की 'डिमोशन' अशी चर्चा सुरू झाली आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे दिसून येते. रश्मी ठाकरे यांची विदर्भात स्त्री संवाद यात्रा सुरू झाली आहे. बुधवारी (ता. 17) ही यात्रा नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात ही यात्रा फिरणार आहे. रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी यात्रेत असणार आहेत.
यात्रेत एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना कसा दगा दिला, यावर भाष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटातील खासदार आणि आमदारांची कथित गद्दारी जनतेसमोर आणण्याची व्यूहरचना केल्याचे दिसत आहे. रश्मी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्यांकडून यात्रेत आगपाखड होण्याचा चांगलाच धसका शिंदे गटाने घेतल्याचे दिसून येत आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या याच धसक्यातून महिला सेनेच्या नियुक्त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागनिहाय जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार भावना गवळी यांच्याकडे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ नेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मीना कांबळी यांच्याकडे कोकण, उत्तर महाराष्ट्र विभाग, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभाग, तर विभागीय संपर्क नेत्या म्हणून पूर्व व पश्चिम विदर्भ आमदार डॉ. मनीषा कायंदे, कोकण विभाग शीतल म्हात्रे, पश्चिम महाराष्ट्र तृष्णा विश्वासराव, उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी सुवर्णा करंजे यांच्याकडे असेल.
वाशीम-पुसद आणि यवतमाळ-वाशीम या दोन लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी या पाच वेळा निवडून आल्या आहेत. अनंतराव देशमुख, मनोहर नाईक, हरिभाऊ राठोड, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे आदी मातब्बर नेत्यांना त्यांनी धूळ चारली. आजघडीला तरी त्यांना टक्कर देणारा नेता मतदारसंघात समोर आलेला नाही. त्यामुळेच त्या राजकीय क्षेत्रात ‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जातात. सतत पाच वेळा निवडून आल्यानंतर पक्षाने त्यांना यापूर्वीच केंद्रात मंत्रिपद द्यायला हवे होते. सहाव्यांदा निवडून येत मंत्री होणारच, अशी स्वप्ने त्यांना पडायला हवी होती. असे असताना पक्ष-संघटनेत राज्याच्या स्तरावर पद न मिळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या नेतेपदातून त्यांच्या पुढील खासदारकीचा आणि मंत्रिपदाचा मार्ग सुकर होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.