Uddhav Thackeray and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Rajya Sabha Election : 'व्हीप'ने उडवली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची झोप !

Assembly Speaker : विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी फुटीसंदर्भात 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार आहेत.

Sachin Deshpande

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक काय घोषित झाली आणि शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची झोप उडाल्याचे चित्र आहे. याला कारणही मोठेच आहे. महाविकास आघाडीकडे येणाऱ्या पाच जागांचा हा विषय आहे. राज्यसभेचे खासदार निवड करण्यासाठी कोणाचा व्हीप चालणार हा अत्यंत महत्त्वाचा आणि लाखमोलाचा प्रश्न समोर आला आहे.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर आता शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकनाथ शिंदे गटाच्या गटनेत्याचा व्हीप लागू होणार आहे. तो त्यांनी पाळला नाही तर पक्ष शिस्तभंगाचा दावा करीत या आमदारांना नोटीस, चौकशी समिती आणि इतर राजकीय अडचणी वाढतील. अशीच काय ती परिस्थिती 15 फेब्रुवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची होऊ शकते किंवा त्याउलट परिस्थिती होण्याचीही शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी फुटीसंदर्भात 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार असून 27 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक आहे. परिणामी व्हीपमुळे शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) यांची झोप मात्र चांगलीच डिस्टर्ब झाल्याचे चित्र आहे. सध्या या सहापैकी तीन जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून विरोधकांच्या ‘मविआ’तील घटकपक्षांकडेही तीन जागा आहेत. महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या काँग्रेस वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आमदारफुटीचा फटका बसला.

अशा वेळी शिवसेना (शिंदे गट) की, शिवसेना (ठाकरे गट) या दोन गटांपैकी कोणाचा खासदार राज्यसभेत जातो, हे पाहण्यासारखे असेल. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन गटांपैकी कोणाचा खासदार जातो, हेदेखील तितकेच महत्त्वाचे असेल. या सर्व निवडणूकप्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना व्हीपने मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या प्रक्रियेत मतदान गोपनीय असल्याने ते सिद्ध करणे तितके सोपे नाही. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असून केवळ सहाच उमेदवार रिंगणात राहिले तर कुणालाच अडचण होणार नाही. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी पराभूत मानसिकता ठेवल्यास ही निवडणूक सोपी होऊ शकते आणि या दोन्ही गटांनी या निवडणूक सत्तारुढ महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले, लढण्याचे ठरविले तर निश्चित महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक ही चुरशीची आणि राजकीय शह-काटशहाची ठरेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा यंदा रिक्त होत असून यात सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, केंद्रीयमंत्री नारायण राणे व माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही रिक्त होतील. राज्यसभेच्या 15 राज्यांतील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT