Ram Nevale for Vidarbha Sarkarnama
विदर्भ

‘जय विदर्भ’च्या माध्यमातून राम नेवले राजकीय आयुधांनी मिळविणार स्वतंत्र राज्य...

राजकीय मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो, हे लक्षात आल्याने आम्ही हा मार्ग निवडल्याचे नेवले Ram Nevale यांनी सांगितले.

मिलिंद उमरे

गडचिरोली : महाराष्ट्रात आतापर्यंत सत्ता भोगलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी विदर्भावर अन्याय केला आहे. विदर्भाच्या जिवावर पश्‍चिम महाराष्ट्राला भरभरून दिले अन् विदर्भाच्या वाट्याला गरिबी, दारिद्य्र, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद दिला. राजकीय पक्षाशिवाय स्वतंत्र राज्य मिळू शकत नाही, हे लक्षात आल्याने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जय विदर्भ या राजकीय पक्षाची निर्मिती केल्याचे राम नेवले यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

जय विदर्भ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राम नेवले असून जनरल सेक्रेटरी विष्णू आष्टीकर, उपाध्यक्ष रंजना मामर्डे, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, कोषाध्यक्ष सुयोग निलदावार, सहसचिव अरुण केदार, सहसचिव गुलाबराव धांडे आहेत. तसेच सदस्यांमध्ये अरुण मुनघाटे, सुदाम राठोड, कृष्णा भोंगाडे, मारोतराव बोथले यांचा समावेश आहे. विदर्भाचा न झालेला विकास यासह सर्व प्रश्नांसाठी विदर्भ राज्य समितीद्वारे वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, त्यात यश आले नाही. राजकीय मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो, हे लक्षात आल्याने आम्ही हा मार्ग निवडल्याचे नेवले यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत नव्या पक्षाच्या निर्मितीची भूमिका स्पष्ट करताना राम नेवले म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून जय विदर्भ पक्षाची घटना तयार करण्यात आली आहे. नैतिक, सामाजिक व लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित घटना तयार केली आहे. निवडणूक आयोग दिल्लीने या पक्षाची नोंदणी करून मान्यता प्रदान केली आहे. नागपूर कराराचे प्रलोभन देऊन 1 मे 1960 ला विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्र राज्यात सामील केले तेव्हापासूनच संपूर्ण विदर्भाचे प्रत्येक क्षेत्रात शोषण करून सर्व संपत्तीचे दोहन करून पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्यात आला व विदर्भाला गरीब, दरिद्री, शेतकरी आत्महत्याग्रस्त, कुपोषणग्रस्त, नक्षलग्रस्त करण्यात आले.

विदर्भाचा हक्काचा निधी पळवून विदर्भाला विकासापासून कोसो दूर ठेवले. याला आतापर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेले सर्वच सत्ताधीश पक्ष जबाबदार आहेत. विदर्भाच्या शोषणातूनच पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्यात आला, तर विदर्भातील 47 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून सर्वच राजकीय पक्षांनी मिळून त्यांचे केलेले खून आहेत. म्हणून शेतकऱ्यांनीसुद्धा त्याचा सूड घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या मैदानावर त्यांना हरवणे गरजेचे आहे. त्यासाठीच या पक्षाची निर्मिती केल्याचे ते म्हणाले. जय विदर्भ पक्ष सत्य व शांततेच्या मार्गाने सत्याग्रह, आंदोलने करून 11 जिल्ह्यांचे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी प्रथम उद्दिष्ट ठेवूनच रस्त्यावर व राजकीय लढाई लढणार आहे. महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास केवळ अशक्य आहे. म्हणून स्वतंत्र विदर्भाचे राज्य निर्माण करून त्यात शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल.

शेतीचे सिंचन 60 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी गोसेखुर्दसह 139 धरणे 32 वर्षांपासून अपूर्ण आहेत, ती त्वरित पूर्ण करणे, शेतीमालाला भाव मिळविण्यासाठी मार्केटिंग प्रणाली उभारणे, त्यांचे उत्पन्न वाढविण्यास ग्रामीण भागात गोदामे, ग्रीन हाऊसेस, कोल्ड स्टोरेजची चेन उभारणे, जागतिक स्तराचे तंत्रज्ञान पुरविणे, शेतीला स्वस्त दरात शेती अवजारे पुरविणे, शेतापर्यंत व शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पक्क्या रस्त्याचे जाळे निर्माण करणे, शेतीला स्वस्त दरात किंवा मोफत वीज देणे, शेतीपिकांचा स्वस्त दरात पीक विमा करून देणे, स्वस्त दरात शेतकर्ज उपलब्ध करून देणे आदी उद्दिष्ट्ये या पक्षाची आहे. शेतकरी व शेतीसाठी विकासाची कामे जलद गतीने करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात येतील. विदर्भ राज्यात शेतीला प्रथम प्राधान्य दिले जाईल व शेती फायद्याची झाली तर ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होऊन शेतकरी, कष्टकरी, मजदूर यांची क्रयशक्ती वाढेल व ग्रामीण भागाची भरभराट होईल. परिणामी ग्रामीण भागात समृद्धी येईल व खेड्यातून शहराकडे येणारा लोकांचा लोंढा थांबेल. शहरावरील जनसंख्येचा भार कमी होईल.

खनिज पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर त्याच जिल्ह्यात उद्योगधंदे उभारून मोठी रोजगार निर्मिती करण्यात येईल, शेतीमालावर प्रक्रिया करणारे कापूस, संत्रा, धान, सोयाबीन, तेलबिया आदींचे उद्योग उभारण्यात येतील. जमीन, पाणी, कोळसा विदर्भातील वापरून सरासरी 6300 मेगावॉट वीज विदर्भात तयार होते. मात्र प्रचंड महाग वीज विदर्भाला देऊन विदर्भाला फक्त 2200 मेगावॉट वीज देऊन शेतीमध्ये 8 तासांचे भारनियमन व प्रदूषण देण्यात येते. त्यामुळे पक्ष सत्तेत आल्यास हा अन्याय दूर करेल. विदर्भात रोजगार निर्मितीचे शिक्षण देणे, गावखेड्यांतील शिक्षणाचा दर्जा वाढविणे, जुन्या शाळा जागतिक दर्जाच्या बनविणे, बारावीपर्यंत शिक्षण सर्वांना मोफत करणे, पुस्तके, गणवेश मोफत देणे आदी कामे करण्यात येतील. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यात येईल. जंगल परिसरातील तरुण आदिवासी नक्षल चळवळीकडे वळले आहेत. जय विदर्भ पक्ष जंगल भागातील आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून जंगल आधारित उद्योग वन परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येतील. त्यामुळे त्या परिसरात तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे नक्षल चळवळ संपविण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा व तालुक्याची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT