प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही इच्छा मनी घेऊन 1992 ला देशभरातून श्रीरामभक्त अयोध्येला गेले होते. यात काळी दौलतखान येथील रामभाऊ पठाडे यांच्यासह सहा जणांचा समावेश होता. (ता. 6) सहा डिसेंबरच्या घटनेनंतर यातील पाच जण घरी परतले. यातील रामभाऊ पठाडे अजूनही घरी परतले नाहीत. वडिलांच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांनी त्यांची परतण्याची आशा सोडली असली तरी श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
राम मंदिरासाठी अनेक जण लढले. काहींनी प्राणाची आहुती दिली. काहींनी कारावास भोगला. पण यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील काळी दौलतखान या गावातील रामभाऊ पठाडे हे कारसेवेसाठी गेले, ते परत आलेच नाहीत. आता त्यांच्या जिवंत असण्याचीही शक्यता कमीच आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या रामभाऊने जीवनात कधी फोटोही काढला नव्हता. त्यामुळे शोधकार्य पुढे सरकू शकले नव्हते.
२२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यात राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या लोकांना सरकारतर्फे निमंत्रण दिले गेले आहे. जे हयात नसतील, त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण दिले गेले. पण रामभाऊ पठाडे यांच्या कुटुंबीयांना मात्र कुणीही बोलावले नाही. कुटुंबीयांना तशी अपेक्षाही नाही. पण त्यांना सरकारने बोलवायला पाहिजे, ही काळी दौलतखान येथील लोकांची भावना आहे. त्यांच्या भावना समजून घेणारा कुणी सापडेल का, याची प्रतीक्षा काळी दौलतखानवासीयांना आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. मंदिरनिर्मितीसाठी देशभरात आंदोलने झाली. अनेक वेळा कारसेवा झाली आहे. अशीच सर्वात महत्त्वाची कारसेवा सहा डिसेंबर 1992 मध्ये झाली होती. या दिवशी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला होता. या कारसेवेत देशभरातील लाखो रामभक्त सहभागी झाले होते. मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे काळी दौलतखान येथील रामभाऊ पठाडे सहभागी झाले होते. त्यावेळी ते 50 वर्षांचे होते.
अयोध्येवरून रामभाऊ मात्र घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र थांगपत्ता लागला नाही. आज ना उद्या वडील परत येतील, अशी आशा पठाडे कुटुंबीयांना होती. एकामागून एक दिवस निघून गेले. मात्र, अजूनही रामभाऊ परतलेले नाहीत. वडील गेल्याचे दुःख पठाडे कुटुंबीयांना आहे. मात्र, आता राम मंदिर पूर्ण झाले असून श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. आता वडील हयात असते तर त्यांना आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया पठाडे कुटुंबीयांनी दिली.
अनेकांच्या स्मृतींना मिळाला उजाळा...
अयोध्या येथे कारसेवेसाठी 1992 मध्ये काळी दौलतखान येथून अनेक रामभक्त गेले होते. कारसेवेदरम्यान ढाचा कोसळला. त्यानंतर एकत्र गेलेले सगळेच विभक्त झाले. काही जण अनेक दिवसांनी कसेबसे गावी परतले. मात्र त्यांचे सोबती रामभाऊ आजतागायत परतले नाहीत. त्याचे त्यांना अतीव दुःख आहे. असे असले तरी त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातून मार्ग काढीत घरापर्यंत कसे पोहोचलो, या त्यांच्या स्मृतींना राम मंदिराच्या निर्मितीमुळे उजाळा मिळाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वडील अयोध्येला गेले होते, तेव्हा मी अकराव्या वर्गात होतो. आमच्या गावातील बल्लू राठोड, दिलीप मोरू यांच्यासह आणखी तिघे गेले होते. डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येकरिता गेलेल्यांपैकी पाच जण काही दिवसांनी घरी परतले. वडील परतले नसल्याने आम्ही चौकशी केली. त्यावेळी सहा डिसेंबरला त्यांची फाटाफूट झाल्याचे परत आलेल्यांनी सांगितले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने आम्ही फार शोध घेऊ शकलो नाही. अनेक वर्षे आम्ही भावंडांनी वडिलांची प्रतीक्षा केली. मात्र, अजूनही वडील परतलेले नाहीत. जे ध्येय घेऊन वडील गेले होते, ते आज पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे.
- गजानन पठाडे, काळी दौलतखान, रामभाऊ पठाडे यांचे पुत्र.
Edited By : Atul Mehere
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.