Ramdas Athawle & Prakash Ambedkar
Ramdas Athawle & Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

RPI To Vanchit : एकेकाळी दिली होती साथ; रामदासरावांची त्यामुळेच पुन्हा बाळासाहेबांना साद

जयेश विनायकराव गावंडे

Lok Sabha Election 2024 : रिपब्लिकन ऐक्याची ताकद काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राने दोनदा पाहिले आहे. 1991 आणि 1998 मध्ये रिपब्लिकन नेते रामदास आठवले, अॅड. प्रकाश आंबेडकर त्यावेळी एकत्र आले होते. एकेकाळी आपल्या सोबत असलेल्या बाळासाहेबांना अर्थात अॅड. प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा सोबत येण्याची साद घातली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आठवले प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावे व त्यासाठी लागेल तर आपले मंत्रिपदही देतो, असे आवाहन करीत आहेत. अकोला येथे आठवले यांनी पुन्हा हिच साद आंबेडकरांना घातली. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी लागले आहेत. अशात अकोल्याची जागा अॅड. प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असे वक्तव्य आठवले यांनी केले.

आंबेडकरांची इच्छा असेल तर त्यांचे एनडीएमध्ये स्वागत आहे. त्यांना आपण आपले मंत्रिपदही देतो, अशी जाहीर ऑफर आठवले यांनी आंबेडकर यांना दिली आहे. आठवले यांच्या या ऑफरमुळे राजकीय चर्चांना उधाण येणार आहे. गायरान जमीन परिषदेच्या निमित्ताने आठवले अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या 12 जागांच्या प्रस्तावाला पाठिंबा आहे. महाविकास आघाडीने हा प्रस्ताव स्वीकारावा.

रिपब्लिकन ऐक्यासाठी आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा. रिपब्लिकन नाव सोडून वंचित बहुजन आघाडी नाव द्यायला नको होते. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदर त्यांच्या तीन भावांना एकत्र आणावे. रिपब्लिकन एकीचा चेंडू आता आंबेडकरांच्या कोर्टात आहे. रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर आपण आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत, असेही आठवले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीला लोकसभेत 45 जागा राज्यात मिळतील, असा दावाही रामदास आठवले यांनी केला. महायुतीच्या दोन जागांची मागणी आठवले यांनी केली आहे. नव्याने स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीत पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. केवळ मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात मराठा समाजाला 69 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला न जाणाऱ्या काँग्रेसवर लोकांनी बहिष्कार टाकावा, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विवाह करावा आणि जोडीदार म्हणून दलित समाजातील वधुची निवड करावी असा सल्लाही त्यांनी दिला.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT