Ramtek APMC News: एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) युती असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी लढत होत आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या निवडणुकीत एकत्र आली आहे.
विचारसरणी बाजूला ठेवून वेगळीच युती-आघाडी नागपूर जिल्ह्याच्या रामटेकमध्ये बघायला मिळते आहे. कॉंग्रेसचे हेवीवेट नेते आमदार सुनील केदार यांना मात देण्यासाठी चार पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनविली आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. चार पक्ष एकत्र आल्याने रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकारण यावेळेस अधिकच गरम झाले आहे.
सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते आमदार सुनील केदार यांनी रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अधिकच लक्ष घातल्याने त्यांना शह देण्यासाठी चार पक्षांच्या नेत्यांनी आघाडी केली आहे. आघाडीमध्ये भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, प्रहारचे रमेश कारामोरे, गोंडवाना गणतंत्र पार्टी व कॉंग्रेस पक्षाचे उदयसिंह यादव यांनी एकत्रित येऊन शेतकरी विकास सहकार आघाडी तयार केली. तर रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी काॅंग्रेस नेते आमदार सुनील केदार यांचा 'हात' धरला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता एकाच गटाकडे आहे. पण पाहिजे तसा विकास झाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी नवी आघाडी काम करेल. विविध योजना राबविण्यात येतील, असा प्रचार नवीन आघाडीकडून केला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती एकाच गटाकडे असल्याने विकास खुंटला आहे. त्यामुळे बाजार समिती विविध समस्यांनी ग्रस्त आहे. सर्व शेतकरी, अडते, व्यापारी व विविध सहकारी संस्थांनी स्थानिक पातळीवर आघाडी तयार केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन घडवून येईल, असा दावा चार पक्षांच्या आघाडीने केला. माजी आमदार डी. एम. रेड्डी, प्रहार संघटनेचे रमेश कारामोरे, कॉंग्रेसचे उदयसिंह यादव, राजेश ठाकरे, संजय मुलमुले, राहुल किरपान, आलोक मानकर, रणवीर यादव हे या आघाडीची धुरा सांभाळत आहेत.
केदारांच्या विरोधात कॉग्रेसचे यादव..
नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद, विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करून कॉंग्रेससाठी विजयाची मालिका चालवत असलेले आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या विरोधात कॉंग्रेसमधील (Congress) उदयसिंग यादव यांनी दंड थोपटले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काही जिल्हा परिषद (ZP) सदस्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती.
आमदार केदार यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सर्वत्र वज्रमूठ होत असताना कॉंग्रेस नेते उदयसिंग यादव यांनी केदार गटाविरोधात उघडउघड दंड थोपटले आहेत. त्यामुळे रामटेक बाजार समिती निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार, हे निश्चित.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.