Government Hospital Akola. Google
विदर्भ

Nagpur Winter Session : अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयाच्या कारभारावर वादळ

Randhir Sawarkar : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले कारवाईचे आदेश

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील हलगर्जीपणाचा विषय सोमवारी (ता. 18) विधानसभेत वादळी ठरला. अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार रणधीर सावकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. चौकशी करुन कारवाईची मागणी त्यांनी केली.

एका महिला रुग्णाला उपचारादरम्यान मिळालेल्या असभ्य वर्तवणुकीचा हा विषय होता. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेत याप्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीची घोषणा केली. दोन आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सातत्याने गैरप्रकार होत आहेत. याची तक्रार मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडं करण्यात आली होती. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला.

रुग्णालयातील गैरप्रकाराला प्रतिबंध घालावा व सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सावरकर यांनी केली. मेडिकल कॉलेजमधील विविध पदांवर तात्काळ नियुक्तीचा विषयही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. अकोला जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, असेही आमदार सावरकर म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयअंतर्गत येणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयात मोनिका निवृत्ती म्हसाळ नामक महिलेला 2 डिसेंबरला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. सिझेरीयन झाल्यानंतर 5 डिसेंबरला महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. 13 डिसेंबरला तपासणीदरम्यान करिता महिलेचे सिझेरीयनचे टाके काढण्यात आलेत. टाके काढताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप सावरकर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संबंधित महिलेला 14 डिसेंबरला कुटुंबीयांनी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनोग्राफी कक्ष, कर्तव्यावरील डॉक्टर व नर्सिंग स्टाफने तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची तक्रार महिलेचा भाऊ रवी मधुकर पाटील यांनी केली. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार सावरकर यांनी रुग्णालयाच्या कारभाराबद्दल सभागृहात प्रश्न विचारले. त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेत.

अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय

अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग, आंतररूग्ण विभागासह एकूण 15 विशेषोपचार कक्ष कार्यरत आहेत. 38 तात्पुरते वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत असून एक वैद्यकीय अधिकारी नियममित आहे. 284 नर्सिंग कर्मचारी रुग्णालयात आहेत. 55 अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवेसाठी मदत करतात. 84 सफाई कर्मचारी आहेत. कक्षसेवक, स्वयंपाकी, चौकीदार, मदतनीस आदी पदांवर 56 कर्मचारी येथे कामावर आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ असतानाही येथे रुग्णांना चोख सेवा मिळत नसल्याची सततची ओरड आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT