By-Election 2023 : लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे मनोबल अकोला जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीत झालेल्या विजयानंतर चांगलेच वाढले आहे. जिल्हा परिषदचे माजी सभापती पंजाब वडाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या चोहट्टा बाजार जिल्हा परिषदेच्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात ‘वंचित’चे योगेश वडाळ हे विजयी झालेत.
पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) जाहीर झाल्यानंतर ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी नीळ उधळत जल्लोष केला. अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. या विजयामुळे ‘वंचित’ची पाळेमुळे अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात घट्ट असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपायला अद्याप जवळपास वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. चोहट्टा बाजार सर्कलची जिल्हा परिषद पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्न करण्यात आलेत. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. पोटनिवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टीसह सर्वच पक्षांनी उमेदवारी दिले होते. त्यामुळे एका सर्कलची ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलं होतं. भाजपचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीवर लक्ष ठेऊन होते.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी या पोटनिवडणुकीकडे जातीनं लक्ष ठेवले होते. आमदार देशमुख यांनी सभा घेत विजयाचा दावा केला होता. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीही काँग्रेस उमेदवारासाठी सभा घेतल्या होत्या. ‘वंचित’च्या ताब्यात असलेली ही जागा जाऊ नये, यासाठी पक्षातील सर्व स्थानिक व राज्य पातळीवरील नेते प्रचारात उतरले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषेदेच्या चोहट्टा बाजार सर्कलमध्ये भाजपकडून गजानन नळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आलेत. स्वतः आमदार सावरकर हे प्रचारासाठी मैदानात उतरले होते. आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक पाहता भाजपने जिल्हा परिषद सर्कलची ही जागा मिळविण्यासाठी जोरदार ताकद लावली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांसह सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते केवळ या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते.
निवडणुकीत खरी रंगत आणली ती आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती पार्टीच्या उमेदवाराने प्रहारकडून कोणत्याही मोठ्या नेत्याने सभा घेतली नाही. फारचा प्रचारही केला नाही. त्यानंतरही ‘प्रहार’चे उमेदवार जीवन खवले हे तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यामुळे ‘प्रहार’ या निवडणुकीत ‘हार के भी बाजीगर’ ठरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभा घेतल्यानंतरही काँग्रेसच्या उमेदवाराची पिछेहाट झाली आहे.
उमेदवारनिहाय मतं
योगेश वडाळ : वंचित बहुजन आघाडी : 3 हजार 781
गजानन नळे : भाजप : 2 हजार 387
जीवन खवले : प्रहार जनशक्ती पार्टी : 1 हजार 765
गोपाळ म्हैसने : शिवसेना-ठाकरे गट : 1 हजार 160
रविंद्र अरबट : कॉंग्रेस : 795
नोटा : 121
एकूण वैध मतं : 10 हजार 09
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.