Ravikant Tupkar on Yavatmal Case. Sarkarnam
विदर्भ

Buldhana : यवतमाळच्या प्रकरणात तुपकर भडकले, म्हणाले एवढी मस्ती येतेच कशी?

जयेश विनायकराव गावंडे

Farmer Poision Case : शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍याने थेट आर्णी तहसीलदारांच्या दालनात जात विषाचा घोट घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसीलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यावरच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यासंदर्भात आता बुलढाणा येथील शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना छळणाऱ्या अधिकाऱ्यांना एवढी मस्ती येतेच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या तहसीलदार परशराम भोसले यांना निलंबित करण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व शासनाने कारवाई न केल्यास आर्णी तहसील कार्यालयात आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसीलमध्ये तालुक्यातील जवळा येथील गौतम गेडेनामक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आर्णी तालुक्यातील जवळा शिवारात या शेतकऱ्याची वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीलगत असलेला नाला वळविण्यात आल्याने शेतात नाल्याचे पाणी शिरले. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्याने आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले यांच्याकडे वारंवार न्याय मिळावा, म्हणून दाद मागितली. तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. त्याचा उपयोग झाला नाही. उलट प्रशासनाकडून प्रत्येक वेळी उडवा-उडवीची मिळाल्याने खचून गेलेल्या शेतकऱ्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत तहसीलदारांच्या कक्षातच विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर बाब म्हणजे या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता उलट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शेतकरीनेते रविकांत तुपकर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यावरच अशा प्रकारची कारवाई होत असेल तर या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवावी लागेल, असे ते म्हणाले. न्यायासाठी शेतकऱ्याने तहसीलच्या चकरा मारल्या. त्यामुळे या प्रकरणात तहसीलदारावर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शेतकऱ्यावरच नोंदविणे म्हणजे संतापजनक प्रकार आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तहसीलदार भोसले यांच्यावर कारवाई न झाल्यास आर्णी तहसीलसमोर आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे यवतमाळ येथील हे प्रकरण आता चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT