Ravindra Tonge Sarkarnama
विदर्भ

Ravindra Tonge News : घरी सहा महिन्यांचं बाळ, तरी 'ओबीसीं'साठी लावली जिवाची बाजी; कोण आहेत रवींद्र टोंगे ?

संदीप रायपूरे

Chandrapur Political News : घरी सहा महिन्यांचं लहानसं बाळ, सहा एकर शेतीचे नियोजनाचीही जबाबदारी त्याच्याच खांद्यावर... पण तो ओबीसी समाजासाठी आपल्या जिवाची बाजी लावतोय. गेली बारा दिवस अन्नत्याग आंदोलन केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अन्नत्यागावर ठाम राहून जिवाची बाजी लावणाऱ्या रवींद्र टोंगे नेमके आहे तरी कोण, याची राज्याला उत्सुकता लागली आहे. (Latest Political News)

एकीकडे जरांगे पाटलांसाठी सत्ताधारी, विरोधक एकवटले असताना टोंगेंच्या आंदोलनाची ना प्रशासनाने ना सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली. अशाही स्थितीतही रवींद्रने हार मानली नाही. रवींद्रच्या समर्थनात चंद्रपुरात विविध संघटनांनी ऐतिहासिक मोर्चा काढाला, मुंडन करून भीक मागून लक्ष वेधले. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ते आंदोलनावर ठाम आहेत. यावर कुठलीही भूमिका घेत नसलेल्या शासन, प्रशासनावर निगरगट्ट म्हणून आरोप होऊ लागले आहेत. ओबीसींसाठी लढणाऱ्या रवींद्र टोंगे (Ravindra Tonge) यांच्याबाबत आता राज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे.

रवींद्र हे चंद्रपूरजवळील वेंगडी या गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या घरी पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील व दोन भाऊ आहेत. गावात असलेल्या सहा एकर शेतीच्या भरवशावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी शेतीसोबत ग्रामपंचायतीत डाटा आॅपरेटरच काम केले आहे.

गोंडवाना विद्यापीठातून एम.कॉम केलेल्या रवींद्रला महाविद्यालयीन जीवनापासून चळवळीशी आपुलकी होती. गेल्या आठ वर्षांपासून तो निरंतरपणे ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी काम करतोय. ओबीसी विद्यार्थी महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. सर्जनशील अन् आव्हानात्मक वातावरणात काम करण्याचे उद्दिष्ट ठेवणारा शेतकरी पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे.

रवींद्रने ओबीसी समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालण्याचा निर्धार केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीला घेत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी अन् विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या. दस्तुरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट देत मार्ग काढण्याचा शब्द दिला.

एकीकडे मराठा आरक्षाणाचा मुद्दा पेटत असताना दुसरीकडे चंद्रपूरमध्ये रवींद्र टोंगे यांनी कुठल्याही स्थितीत मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली. राज्यातील ओबीसींसाठी ७२ वसतिगृह कधी सुरू करणार, स्वाधार योजना लागू होणार की नाही, असे विविध मुद्दे घेत त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आता या आंदोलनाची धग राज्यभर पेटण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT