Bhandara Political News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात 'वंशाच्या दिव्यापुढे 'बेटी बचाव हारली' आहे. या जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ९०७ इतके आहे. मुलींच्या जन्मदराचा आलेख सतत घसरत राहिल्यास भविष्यात लग्नासाठी मुली देता का मुली? असे विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निधी कुठे कमी पडला याचा 'फीडबॅक' घेण्याची गरज शासनाला निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे आपला पालक जिल्ह्याच्या कारभार आपल्या जवळच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला देऊन ही "त्या" अधिकाऱ्याने जिल्ह्यासाठी विशेष कामगिरी करू न शकल्याने आता या अधिकाऱ्यांमुळे स्वत: पालकमंत्री या नात्याने विरोधकाचे खडे बोल ऐकण्याची वेळ देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) आली आहे.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकून महिलांना आरक्षण दिले आहे. असे असले तरी मुलींचे जन्मदर वाढविण्यास केंद्र सरकार कमी पडलेले दिसत आहे. यात महाराष्ट्र राज्य ही जन्मदर वाढविण्यात कमी पडलेला दिसत आहे. राज्यात हजार मुलांमागे ९४० मुली हे प्रमाण घटून ९३२ वर आले आहे. यात भंडारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांतील मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घसरत आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ९०७ इतके कमी आले आहे.
मुलींच्या जन्मदराचा आलेख घसरत असल्याने सरकारला खंबीर पावले उचलण्याची वेळ आली आहे. भंडारा जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९२४ होता, तर २०१९-२० मध्ये मुलींचा जन्मदर ९४२ राहिला. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ९२७, २०२१-२२ मध्ये ९३७ होता. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण ३० ने पुन्हा घटल्याचे दिसते. त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून सर्वच पातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.
विदर्भातील नंबर दोनचे महत्त्वाचे राजकीय केंद्र म्हणून भंडारा जिल्ह्याकडे पाहिले जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) असो की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असो सर्वांचा हा 'भंडारा' गृह जिल्हा आहे. त्यामुळे राजकीयदृष्टया महत्त्वाचा असलेल्या भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कड़े ठेवले आहे.
या जिल्ह्याच्या विकास अधिक व्हावा; त्यामुळे या भंडारा जिल्ह्याचे शिलेदार म्हणून आपल्या नागपूर या गृह जिल्ह्यात काम केलेला अधिकारी, नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेले आयएएस योगेश कुंभेजकर यांना जिल्हाधिकारी म्हणून पाठविले आहे. मात्र, कुंभेजकर हवे तसा विकास करू शकले नाहीत, मुलींचे घटलेले जन्मदर यातील एक उदाहरण आहे. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.(Latest Marathi News)
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप व आंदोलनांच्या मशाली पेटत आहेत. अशातच फडणवीसांचा पालक जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या असलेल्या असुविधांना पुढे करत आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार गट सरसावला आहे. आता जिल्ह्यासाठी विशेष कामगिरी करू न शकल्याने आता या अधिकाऱ्यामुळे स्वत: पालकमंत्री या नात्याने विरोधकाचे खड़े बोल ऐकण्याची वेळ फडणवीसांवर आली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.