Vanchit Bahujan Aaghadi Party Workers Akola. Sarkarnama
विदर्भ

Akola Vanchit Aaghadi : जोरदार मोर्चेबांधणी करीत ‘वंचित’नं तयार केला रोडमॅप

Loksabha Election : भाजपच्या ताब्यात असलेला गड सर करण्यासाठी व्यूहरचना

जयेश विनायकराव गावंडे

Prakash Ambedkar : गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेला अकोला लोकसभेचा गड सर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं जोरदार तयारी सुरू केली. ‘वंचित’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीसाठी जोमानं कामाला लागलेय. भाजपचं आवाहन पेलण्यासाठी ‘वंचित’कडून सध्या युद्धपूर्वी अभ्यास कण्यात येत आहे.

‘वंचित’ पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवास्थानी लोकसभा निवडणुकीसाठी ‘रोडमॅप’ तयार केला. कुठल्याही परिस्थितीत विजय खेचून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. (Road Map Prepared For Loksabha Election 2024 By Vanchit Bahujan Aaghadi For Akola Loksabha Constituency For Prakash Ambedkar)

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं पुन्हा एदा जाहीर केलं. त्यानंतर आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला. १९८४ पासून ॲड. आंबेडकर सातत्यानं अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते आपलं भाग्य आजमावणार आहेत. आंबेडकर हे काँग्रेसच्या मदतीनं दोनदा खासदार राहिले आहेत. लोकसभेच्या आठ निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आगामी निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघांच्या बांधणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळं आघाडीशिवाय स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेशच त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. कार्यकर्त्यांनीही आपल्या ‘साहेबांना’ लोकसभेत पाठविण्यासाठी जिवाचे रान करण्यास सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितला भाजपचं मोठं आव्हान आहे. त्यामुळं आंबेडकरांसह त्यांचा परिवारही यासाठी खंबीरपणे उभा झाला. अॅड. आंबेडकर यांच्या पत्नी अंजली व मुलगा सुजात हेदेखील मैदानात उतरले आहेत. विविध धार्मिक उत्सवांमध्ये सहभाग, आंदोलन, जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडं लक्ष देण्यास या सर्वांनी सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी पक्षात फेरबदलही करण्यात आले आहेत.

अॅड. आंबेडकर व त्यांचा परिवारासह संपूर्ण ‘वंचित’ने संवाद दौरा काढण्यावर भर दिला. संयुक्तपणे संघटनात्मक बांधणी, निवडणुकीसाठी यंत्रणेची उभारणी आदींसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. मुंबई येथील संविधान सन्मान महासभा होताच अकोला जिल्हा व शहरभर पक्षाच्या कार्यक्रमाचा धडाका लावण्यात येणार आहे. त्याचं नियोजनही करण्यात आलं आहे. पक्षात गटबाजी किंवा मतभेद होणार नाही, यावरही लक्ष देण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवा महासचिव तथा प्रवक्ता राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाठ, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रभा सिरसाठ, ज्येष्ठ नेत्या पुष्पा इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, भारिप बहुजन महासंघाचे महासचिव दीपक गवई, प्रतिभा अवचार, अॅड. संतोष रहाटे, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने आदींकडे जबाबदाऱ्यांचं वाटपही करण्यात आलं आहे.

अकोला लोकसभेची जागा जिंकण्यासाठी सुजात आंबेडकर यांनी पक्षातील युवा आघाडीसह संघटनेत जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुजात अकोल्यात फारसं लक्ष घालत नव्हते. मात्र, आत ते अधिक सक्रिय झाले आहेत. सध्या सुजात पूर्णवेळ अकोल्यातच असतात. अंजली आंबेडकर या सुरुवातीपासूनच अकोल्यात सक्रिय आहेत. त्यांनी पक्ष संघटनांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT