Akola Political News : ‘देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप संवैधानिक मूल्य आणि आदर्श नष्ट करण्यासाठी काम करीत आहे. यांच्याशी लढण्यासाठी आपण दोघेही वचनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहोत. त्यातूनच मी वंचित बहुजन आघाडी या माझ्या पक्षाच्या वतीनं तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतोय.. नक्की या’, असं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवलंय.
शनिवारी (ता. २५) मुंबईतील दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ही संविधान सन्मान महासभा होणार आहे. सभेला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीतील सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. अकोला येथून हे निमंत्रणपत्र पाठविण्यात आले आहे. (Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar From Akola Invites Congress Leader Rahul Gandhi for Samvidhan Sanman Mahasabha at Mumbai)
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रातून काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे कौतुक केलं आहे. काँग्रेसचे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांसाठी अॅड. आंबेडकर यांनी हे कौतुक केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी ही माहिती दिली. ॲड. आंबेडकर यांनी याबाबत म्हटले होते की, संविधान सन्मान महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देणार आहे. यावर वंचितच्या राज्य कार्यकारिणीचा अंतिम निर्णय झाला. त्यानुसार ॲड. आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे.
सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारत काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेची आठवण त्यांनी राहुल यांना करून दिली. त्यावेळी केवळ तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसला स्वतःच्या नेत्यांकडून बंडखोरीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पक्षाचे विभाजन झाले. या उद्रेकाच्या काळात भारिप बहुजन महासंघ पक्षाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पाठिंबा दिला होता, याचं स्मरण ॲड. आंबेडकर यांनी राहुल यांना करून दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय राज्यघटनेनं भेदभाव सहन न करणाऱ्या, उपेक्षित आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हितांचे रक्षण केले आहे. त्याच संविधानाचा सन्मान करण्यासाठी महासभा आयोजित केल्याचं त्यांनी पुढं म्हटलंय. आपले आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर संस्थापकांनी देशासाठी जे स्वप्न पाहिले होते, त्यांचा सन्मान करण्यासाठी महासभा असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी लिहिलं आहे.
देशात आरएसएस-भाजप ज्यांचे अस्तित्व केवळ संवैधानिक मूल्य आणि आदर्श नष्ट करण्यावर आधारित आहे, यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून आपण वंचित बहुजन आघाडी या आपल्या पक्षाच्या वतीनं संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देत आहोत. भारताच्या भविष्याबद्दल राहुल गांधी यांची दृष्टी, त्याबाबतची भूमिका मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळेल, असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या कार्यालयात वंचितने हे पत्र प्रत्यक्ष व ई-मेल दोन्ही माध्यमातून पोहोचविले आहेत.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.