Yuva Sangharsh Yatra Sarkarnama
विदर्भ

Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर नागपुरात राडा, रोहित पवारांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Rohit Pawar News : नागपुरात दाखल झालेल्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप

Deepak Kulkarni

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून युवा संघर्ष यात्रा सुरु होती. मंगळवारी या यात्रेचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. मात्र, या समारोपानंतर रोहित पवार हे आक्रमक झाले अन् त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह विधानभवनाकडे धाव घेतली आहे. मात्र, यावेळी पोलिसांनी या यात्रेला रोखल्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांत शाब्दिक चकमक उडाली. यामुळे नागपुरात एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी युवा संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांसह आमदार रोहित पवारांनाही ताब्यात घ्यावे लागले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नागपुरात दाखल झालेल्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला आहे. याचवेळी आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या युवा संघर्ष यात्रेला पोलिसांनी अडवले असून रोहित पवारांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे वातावरणात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पण आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने, रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

युवा संघर्ष यात्रा आठशे किलो मीटरचा प्रवास करून शेतकरी, बेरोजगार, महिला आणि बरोजगारांचे प्रश्न समजून घेऊन ते सरकारकडे मांडायचे होते. मात्र सरकारने आमच्या समस्या जाणून न घेता तहसीलदार आणि शहराध्यक्षांना पाठवून जनसामान्य शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. या कृतीतून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचेच सिद्ध होत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, जर सरकारकडून कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देणार आहोत.तसेच शेतकरी,तरुणांविषयीचे काही मागण्या आमच्या आहेत. या मागण्यांचे निवेदन घेण्यास एकही सरकारच्या प्रतिनिधी आमच्याकडे आला नाही. असा आरोप करत आमदार पवार आक्रमक झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच राज्यात तरुणांचे MPSC परीक्षेसंदर्भात,शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत.तसेच राज्यातील आरोग्ययंत्रणा खिळखिळी झाली आहे. शेतकरी वर्गाचे काही समस्या आहेत यांसारखे अनेक मुद्दे घेऊन आम्ही सरकारला भेटणार होतो. पण या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

पवार 'डिटेन्शन सेंटर'मध्ये...

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना युवा संघर्ष यात्रेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. अधिवेशन काळात नियमभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात येते. आता पवारांनाही डिटेन्शन सेंटरमध्ये आणण्यात आले आहेत. त्यामुळे रोहित पवार विधानभवनात पोहचू शकले नाहीत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी आम्हाला सहकार्य करण्यास नकार दिला. युवा संघर्ष मोर्चा यांच्यामार्फत आंदोलन करण्यात येत होतं. अधिवेशन कालावधीत रोहित पवार यांनी विधानभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन डिटेन्शन सेंटरला नेण्यात आल्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT