RSS Nagpur Google
विदर्भ

Reshimbag Nagpur News : शताब्दी महोत्सवासाठी संघ आतापासूनच ‘दक्ष’; गाव तिथे शाखेवर देतोय लक्ष !

Atul Mehere

Nagpur RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाला अद्याप एक ते दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र येत्या दोन वर्षांत कुठे कुठे काय काय करायचे आहे, यासंदर्भातील कृती आराखडा संघाने आताच ठरविला आहे. या नियोजनानुसार पावले टाकण्यास संघाच्या स्वयंसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. (A two-year action program was decided in Nagpur, the vice-capital)

नागपुरातील रेशीमबाग येथील संघभूमीत यासंदर्भात झालेल्या बैठकीत आगामी दोन वर्षांचे ‘प्लॅनिंग’ ठरविण्यात आले आहे. संघाचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाईल, तोपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात गाव तेथे शाखा असावी, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्ष्य आहे. त्यामुळे छोट्यात छोट्या गल्लीबोळातील तरुणाईला एकत्र करून शाखांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संघाचे पारंपरिक स्वयंसेवक तर शाखांमध्ये नियमितपणे येतातच. परंतु जास्तीत जास्त तरुणाई संघ विचारसरणीशी कशी जोडली जाईल, याचा प्रयत्न येत्या दोन वर्षांत केला जाणार आहे. त्यासाठी ‘केजी टु पीजी’ पर्यंतच्या तरुणाईशी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.

धर्मांतर रोखण्याचा दुसरा अजेंडा संघाने डोळ्यापुढे ठेवला आहे. गत काही वर्षांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये धर्मांतराचे लोण पसरत आहे. त्यामुळे उघड विरोध न करता लोकांमध्ये धर्मांतरण रोखण्यासाठी प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी स्वयंसेवकांवर देण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत यासाठी संघाचे स्वयंसेवक दुर्गमातील दुर्गम गावात पोहोचले पाहिजे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

नवा संदेश, गावाकडे चला

सनातन संस्कृती काय आहे, त्याचे महत्व हे स्वयंसेवक लोकांना समजावून सांगणार आहेत. याशिवाय कोणत्या भागात कोणत्या कारणांमुळे लोक धर्मांतर करीत आहेत, याचा सखोल अभ्यास करून त्याची माहिती संघाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे धर्मांतरण रोखण्यासाठी क्षेत्रनिहाय ‘अजेंडा’ ठरविण्यात येणार आहे. यासाठी छोट्यात छोटा उत्सवही गावांमध्ये जाऊन साजरा करण्याचे आदेश स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार असले तरी काही राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष सत्तेवर आहेत. त्यातील काही पक्ष सनातन धर्म, हिंदुत्व आणि संघाचे कट्टर विरोधक आहेत. अशा राज्यांमध्ये काम करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास स्वयंसेवकांना सांगण्यात आले आहे. स्थानिक किंवा पक्षाच्या राजकारणात न पडता लोकांपर्यंत ‘सनातन’चे महत्व कसे पोहोचविता येईल, यावर कटाक्ष देण्यात येणार आहे.

देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप संघाने आपल्या परिवारातील सदस्यांना कोणतीही स्पष्ट सूचना दिलेली नाही. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येईल, तसतशा क्षेत्रनिहाय सूचना परिवारातील सदस्यांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे सध्या तरी संघाचे शाखावाढीवरच विशेष लक्ष आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT