Sand smugglers, Nagpur.
Sand smugglers, Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Sand smugglers : वाळू तस्करांची अशीही क्लुप्ती; राजकीय नेत्यांचे वजन वापरून काढला 'हा' मार्ग !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District News : वाळू चोरी करण्यासाठी तस्करांनी नवीनच फंडा वापरणे सुरू केले आहे. घरकुलाचे बांधकाम करायचे आहे, असे सांगून वाळुची मागणी केली जाते. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून निवेदने दिली जातात. एकदा का परवानगी मिळाली की, मर्यादा ओलांडून वाळूचा उपसा करून वाहतूक केली जाते. हा प्रकार नागपूर जिल्ह्यात सर्रास सुरू आहे.

नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा आणि वाहतूक केली जात आहे. राजकीय नेत्याचे वजन दाखवीत घरकुलाच्या नावाखाली खासगी आणि शासकीय बांधकामाच्या ठिकाणी वाळूची वाहतूक केल्या जात आहे. घरकुलासाठी सुरवातीला दोन ब्रॉसची रॉयल्टी देण्यात येत आहे. त्यांना त्याकरिता काही निकष लावण्यात आले आहेत.

चौकीवर कर्मचारी असतात. कारवाईकरिता गेले असता वाळू चोरांना आधीच माहिती होते आणि पळून जातात. याकरिता ठोस पाऊल उचलावे लागतील, असे मोद्याचे तहसीलदार मलिक विराणी यांनी सांगितले. पण ठोक कारवाई होतच नाही. ही वस्तुस्थिती आहे.

गौण खनिज चौक्या ठरताहेत शोभेसाठीच..

वाळू, मुरूम आदींसह गौण खनिजाची अवैधरीत्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या ‘गौण खनिज वाहतूक तपासणी नाका’ अशा चौक्या उभारल्या आहेत. मात्र उभारलेल्या चौकीत संबंधित विभागाचे कर्मचारी अमावस्या, पोर्णिमेलाच दिसतात. मोठ्या प्रमाणात सूरनदीच्या पात्रातून वाळूचोरी सुरू असून याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उभारलेल्या गौण खनिज तपासणीच्या चौक्या शोभेच्या ठरत आहेत.

अवैधरीत्या होत असलेल्या वाळू चोरीवर वचक लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी कडक पावले उचलली आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनामार्फत होताना दिसून येत नाही. वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी मौदा महसूल विभागाने सात दिवसांसाठी सात पथके तयार केली. तरीही त्याचा फारसा फायदा होताना दिसून येत नाही. अरोली, भांडेवाडी, कोदामेंढी, इंदोरा, वाकेश्वर, शिरसोली, तांडा, मोरगाव, महालगाव आदी ठिकाणच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन आणि चोरीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टरद्वारे सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे ग्रामस्थांना कर्दनकाळ ठरत आहे.

दिवस रात्र सुरू असलेल्या वाळू उत्खनन आणि वाहतुकीमुळे नदीपात्राला, पर्यावरणाला, पाणीपुरवठ्याच्या विहिरीला, रस्त्याला आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे दिवसाकाठी लाखांवर महसुलाचे नुकसान होत आहे. महसूल, पोलिस विभाग, खनिकर्म, वाहतूक, पर्यावरण, गुन्हे शाखा आदी विभागाकडून फारशी कारवाई होत नसल्याने वाळूमाफिया (Sand Mafiya) फोफावले आहेत. यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असून गुन्हे वाढू लागले आहेत. याला जबाबदार विभागातील अधिकारी तितकेच आहेत.

महसूल विभागाची (Department of Revenue) कारवाई झाल्यास एक लाख आठ हजाराचा दंड भरल्याशिवाय गाडी सुटत नाही. त्यामुळे तितक्या लांब जाण्यापेक्षा आधीच प्रकरण सेट केले जाते. दिवसेंदिवस अवैध वाळूच्या (Sand) धंद्यांत येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पांढऱ्या पोशाखातील राजकीय नेते (Political Leaders) देखील यात सक्रिय असल्याचाही आरोप होतो. वाळूमाफियांचा हैदोस थांबविण्याकरिता शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT