Sandeep Tajane Sarkarnama
विदर्भ

Sandeep Tajane : बसपातील धुसफूस चव्हाट्यावर; माजी प्रदेशाध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी

Expulsion of the former state president from the party : माजी प्रदेशाध्यक्ष व तेलंगणचे प्रभारी ॲड. संदीप ताजने यांच्यासह एकूण दहा जणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोज होणारे वाद आणि कारवायांमुळे बसपातील निष्ठावंत कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : बहुजन समाज पार्टीतून केव्हा कोणाची हकालपट्टी होईल आणि घरवापसी केली जाईल याचा काही नेम राहिला नाही. लोकसभेच्या निवडणुकीतनंतर बपसाने संपूर्ण राज्याची कार्यकारिणी बरखास्त केली होती. आता माजी प्रदेशाध्यक्ष व तेलंगणचे प्रभारी ॲड. संदीप ताजने यांच्यासह एकूण दहा जणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोज होणारे वाद आणि कारवायांमुळे बसपातील निष्ठावंत कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

ताजने यांच्यासह नीमा मोहरकर, लता बांबोडे, अविनाश रंगारी, संजय रंगारी, रक्षित बारसागडे, रोशन गजभिये, शंकर भेंडारकर, विजय दहाट आणि राजेंद्र गजभिये यांची पक्षातून गच्छंती करण्यात आली आहे. या सर्वांवर पक्षविरोधी कारवाया आणि बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे बुधवारी (ता.१७) बसपाचे प्रदेश प्रभारी खासदार रामजी गौतम आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत राज्य समितीची पहिली बैठक मुंबईत घेण्यात आली.

याच बैठकीत कार्यकारिणीची घोषणा करून पदाधिकाऱ्यांना कामाचे वाटप करण्यात आले. यादरम्यान नवनियुक्त अध्यक्ष आणि प्रभारी यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या महिलेने मंचावर जाऊन थेट रामजी गौतम यांच्याच कनशिलात लगावली. ही महिला भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) असल्याचे कळते. सीमा रंगारी असे या महिलेचे नाव असून ती जिल्हा प्रभारी होती. त्यानंतर झटपट हकालपट्टीचे आदेश काढण्यात आले.

महिनाभरापूर्वी डोंगरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. विरोधातील कार्यकर्ते येऊ नये याकरिता मुंबईत बैठक ठेवली. आपल्या मर्जीतील कार्यकर्ते व समर्थकांनाच बैठकीला बोलावले होते असाही आरोप डोंगरे यांच्यावर आहे. लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल बघून बसपाने महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारिणीची बरखास्त केली होती.

राज्यात मिळालेली अत्यल्प मते आणि गटबाजीमुळे निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मारहाण, गटबाजीचे प्रकरण बरेच गाजले. निवडणुकीनंतर मतमोजणीपूर्वी दोन माजी पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर गटबाजी आणखीच चव्हाट्यावर आली होती. निलंबित पदाधिकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपूर जिल्हाध्यक्षाने पत्रकार परिषद घेतली होती. आपापसातील वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पक्षाध्यक्ष मायावती यांच्या दरबारात गेले. दोन्ही गटांची भूमिका जाणून घेतल्यावर त्यांनी 24 जून रोजी ॲड. परमेश्वर गोणारे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार करून कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT