यवतमाळ : विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमध्ये गेल्याची चर्चा रंगत आहे. माजी वनमंत्री आणि विद्यमान आमदार संजय राठोड यांचाही मोबाईल बंद येत आहे. त्यामुळे ते देखील नॉट रीचेबल आहेत. आमदारांच्या अचानक गायब होण्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
विधान परिषदेच्या निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणात होत आहे. त्याचा पहिला दणका शिवसेनेला (Shivsena) बसला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे 17 आमदारांसह सुरतमध्ये एका हॅाटेलमध्ये असल्याची चर्चा आहे. महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, श्रीनीवास वनगा, संजय गायकवाड, संजय रायमूलकर हे आमदार नाराज असून त्यांनी शिंदे यांची साथ देण्याचे ठरविल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. विधान परिषद निवडणूक आटोपताच शिवसेनेचे नेते गायब झाले. यात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचा समावेश आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. आमदार संजय राठोड यांनाही पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना केवळ आश्वासन मिळत आहे. त्यामुळे आमदार राठोड नाराज होते. राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेनेचे नेते गायब झाल्याने नवीन राजकीय समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत. या धक्कातंत्राने भारतीय जनता पक्ष आपल्या सत्ता स्थापन करण्याच्या हेतूत सफल होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.
विधान परिषद निकालात शिवसेनेची तेरा मते फुटली होती. सेनेचे दोन्ही उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे काठावर जिंकून आले होते. निकालानंतरच एकनाथ शिंदे नॅाट रिचेबल झाले होते, तसेच वर उल्लेख केलेल्या आमदारांचाही संपर्क होत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकारवर मोठे संकट आले आहे. शिंदे हे आज दुपार नंतर गुजरातमध्येच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.