Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

संजय राऊत भडकले; म्हणाले, राजकीय सूडबुद्धीच्या कारवाईचं उत्तर द्यावं लागेल…

भाजप शासीत राज्यांमध्ये ईडीची कार्यालये बंद करून ठेवलेली आहेत आणि गैरभाजप सरकार असलेल्या राज्यांमध्येच ईडीने कारवायांचा धडाका लावला असल्याचा आरोप खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील मालमत्ता ईडीने आज जप्त केली. त्यानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसंपर्क अभियानासाठी नागपुरात आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत या कारवाईने चांगलेच भडकले. केंद्र सरकारला या राजकीय सूडबुद्धीच्या कारवाईचं उत्तर द्यावं लागेल, असं ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून ईडी गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि आज श्रीधर पाटणकर यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील नेते संतापले आहेत. पाटणकर हे केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray)आणि रश्‍मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे नातेवाईकच नाही, तर ते आम्हा सर्वांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत. भाजप शासीत राज्यांमध्ये ईडीची कार्यालये बंद करून ठेवलेली आहेत आणि गैरभाजप सरकार असलेल्या राज्यांमध्येच ईडीने कारवायांचा धडाका लावला असल्याचा आरोप खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

सद्यःस्थितीत देशातील न्यायालयेसुद्धा दबावात आहेत. यापूर्वी देशात असे कधी घडले नव्हते. चार राज्यांमध्ये तुम्ही जिंकले म्हणजे देशाचे मालक होत नाही. ही तर तानाशाहीची धोकादायक सुरूवात आहे. आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाका, आम्ही तयार आहोत. पण देशाचे स्वातंत्र आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सतत लढा देत राहू. महाविकास आघाडी सरकारमधील स्तंभांना दबावात आणून तुम्हाला वाटत असेल की हे सरकार पडेल, राष्ट्रपती राजवट लागेल, तर झोपेतून जागे व्हा, कारण आम्ही लढणारे आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.

युपीए सरकारच्या काळात फार फार तर २० ते २५ ईडीच्या कारवाया झाल्या असतील. पण भाजपच्या ७ वर्षाच्या सरकारच्या काळात दोन, अडीच हजाराच्या वर कारवाया ईडीने केल्या आहेत. यातील अनेक कारवाया या चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या आहेत. हे नंतर न्यायालयात स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात आपली सत्ता आली नाही म्हणून सत्ता खेचून घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा पद्धतीने गैरवापर करून प्रयत्न केले जात आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत. ही हुकूमशाही महाराष्ट्र सहन करणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT