संजय राऊत म्हणाले; देशमुखांबाबत घाईच झाली, पण मलिकांचा राजीनामा घेणार नाही...

सीबीआयने २२ धाडी घातल्या, ईडीने ५० च्या वर धाडी घातल्या, आयकर विभागाने ४० धाडी घातल्या. इतक्या धाडी घालून त्यांना कोणता विक्रम प्रस्थापित करायचा होता, असा प्रश्न संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेणार नाहीच. कारण त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपही सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे देशमुखांचा राजीनामा घेण्यात जरा घाईच झाली, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज येथे म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेली कारवाई हा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत खासदार राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेकडून १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर ईडीने ही कारवाई केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांकडे सोपवली. परंतु अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाला.

अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाला असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीत आम्ही थोडं संयमाने घ्यायला पाहिजे होतं. कारण अनिल देशमुखांच्या संदर्भात काय पुरावे होते, हे आम्ही पाहिले आहेत. अनिल देशमुखांवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर शेकडो धाडी घातल्या. सीबीआयने २२ धाडी घातल्या, ईडीने ५० च्या वर धाडी घातल्या, आयकर विभागाने ४० धाडी घातल्या. इतक्या धाडी घालून त्यांना कोणता विक्रम प्रस्थापित करायचा होता, असा प्रश्न संजय राऊतांनी केला.

तुमच्याकडे केंद्रीय यंत्रणा, तर आमच्याकडे पोलीस..

अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवारांवर दबाव होता का, असा प्रश्न विचारला असता, मला असं वाटत नाही, असे ते म्हणाले. नवाब मलिकांचा राजीनामा राज्य सरकार घेत नाही यावरून प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, "आम्ही मलिकांचा राजीनामा का घ्यायचा? अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही आमची चूक होती, त्यांचा राजीनामा घ्यायला नको होता हे मी आजही म्हणतो आहे. नवाब मलिक हे कॅबिटेनमध्येच राहतील. भाजपचा जो भ्रम होता की आम्ही सर्व कॅबिनेट मंत्र्यांना जेलमध्ये टाकू, हे आम्हीही पाहून घेऊ. जसं तुमच्याकडे केंद्रीय यंत्रणा आहेत तसंच आमच्याकडे राज्याचे पोलीस आहेत. महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षमपणे काम करत आहेत हे तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये पहायला मिळेल. त्यामुळे कॅबिनेट जेलमध्ये जातं की आणखी कोणी जातं हे लवकरच कळेल, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले, वहीनीसाहेबांचा आग्रह पाळू...

संपूर्ण देशभरात भाजप सध्या सुडाचं राजकारण करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारने खुळखुळा करून टाकला आहे. कारवाईची भीती ते दाखवत आहेत, ज्याचा मी देखील एक पिडीत आहे. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसावर आरोप ठेवण्यात आले, एक वर्ष झालं पण अद्याप त्यांना चौकशीत काय सापडलं? युपीए सरकारच्या काळात फार कमी कारवाया होत होत्या, मात्र आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे. यामागचा हेतू काय आहे? या कारवायांमधून काय सापडलं, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे. आमची बदनामी करून, भिती दाखवून तुम्ही शिवसेनेला वाकवू शकत नाही. आमच्या आघाडीचा केस वाकडा करू शकणार नाही, असं म्हणत राऊतांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com