Chhagan Bhujbal, Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting : भुजबळांचा पुढाकार योग्यच, आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी

Rajesh Charpe

Nagpur News, 16 July : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोणीच नाही. महायुतीचे सरकार मराठा समाजासोबत आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का यावर शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेला पुढाकार, तसेच त्यांनी घेतलेली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट योग्यच असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

राज्यात आरक्षणावरून मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी समजामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राहणे आवश्यक आहे. छगन भुजबळ यांनी केलेली विनंती शरद पवार मान्य करतील अशी आशा देखील बावनकुळे यांनी व्यक्त केली.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेच्या 288 जागेचे सर्वेक्षण करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यांना तो अधिकार आहे. याबाबत मतभेदाचे कारण नाही. लोकसभेप्रमाणे महायुती विधासनभेची निवडणूक एकत्रित लढणार आहे. ज्याची जिंकूण येण्याची क्षमता त्याला उमेदवारी द्यायची हा आमचा फॉर्म्युला आहे.

उमेदवार कोणाचाही असला तरी महायुती म्हणून सर्वच पक्ष एकमेकांना मदत करणार आहोत. कोणती जागा कोणाला? यापेक्षा जागा जिंकणे महत्त्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आमदार नवाब मलिक यांना तिकिट द्यायचं की नाही? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यावर चर्चा केली जाईल. सहमतीने निर्णय घेतला जाईल.

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेला विरोधकांनी आधी जोरदार विरोध केला. कर्ज काढून बहिणीची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांचा आहे. आता तेच लोक लाडक्या बहिणीला लाभ मिळवून देण्यासाठी सरसावले आहेत. स्वतःचे बॅनर, पोस्टर लावून अर्ज भरून देत आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना हे सुचले नाही. आता हेच लोक आम्हीच योजना आणली असे दर्शवत आहेत. मुलं कोणाचे, बारसे कोण करत आहे आणि लाडू कोण खात आहे असा प्रकार राज्यात सुरू आहे. त्यामुळे आम्ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या योजना गावागावात पोहोचवणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT