MNS Agitation Sarkarnama
विदर्भ

Buldhana News : लाचेची रक्कम घेऊन मनसैनिक पोहोचले कार्यालयात !

सरकारनामा ब्युरो

फहीम देशमुख

Buldhana News : कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यानंतरही आणि तलाठी कार्यालयातून प्रकरण शिफारशींसह पाठवल्यानंतरही निव्वळ पैशासाठी मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यासाठी आज (ता. 22) शेगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम घेऊन मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेत राडा केला.

या वेळी अनुपस्थित असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेरील बाकड्यांची फेकफाक करीत संताप व्यक्त केला. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नागरिकांच्या जमिनीच्या नोंदी तलाठ्यांमार्फत मंडळ अधिकारी कार्यालयाकडून केल्या जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातून प्रकरण मंजूर होऊन मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतरही कुठलेही कारण सांगत नागरिकांची प्रकरणे रद्द केल्या जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

जमिनीच्या नोंदीसंदर्भातील प्रकरणे तलाठी स्तरावर मंजूर झालेली असताना आपल्याकडे आलेल्या प्रकरणात नोंद करणाऱ्या मालकांकडून लाचेची मागणी केल्या जात आहे. अशा तक्रारी नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केलेल्या होत्या. यासंदर्भात मनसैनिकांनी अनेक वेळा मंडळ अधिकाऱ्यांकडे जाऊन याबाबत नागरिकांची कामे तातडीने करण्याच्या सूचना व विनंती वेळोवेळी केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेवटी तक्रारी वाढतच गेल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमितबापू देशमुख आणि तालुका अध्यक्ष रवींद्र उन्हाळे यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी शेगाव शहरातील जुने पोस्ट ऑफिसजवळील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसैनिक आपल्याकडे येत आहेत, याची चाहूल लागताच मंडळ अधिकारी तेथून निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयात बाहेरील बाकड्यांची फेकफेक करीत संताप व्यक्त केला. मनसैनिकांनी या वेळेस मागितल्या जाणाऱ्या लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर आपला मोर्चा सरळ तहसील कार्यालयाकडे वळविला. या ठिकाणीही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांची भेट घेतली.

लाच मागणाऱ्या देशमुख नामक मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून देत ज्या नागरिकांना पैशाची मागणी झाली त्यांना प्रत्यक्ष हजर केले. यावरून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी मंडळ अधिकारी देशमुख यांनी प्रलंबित ठेवलेले, रद्द केलेले व मंजूर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्काळ नायब तहसीलदारांची नियुक्ती करीत असल्याचे सांगितल्याने मनसैनिकांचा राग शांत झाला.

माध्यमांशी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीचा पाढा वाचत पुन्हा सदर कर्मचारी कार्यालयात दिसून आला तर त्याला मनसे स्टाइलने धडा शिकवण्याचा इशारा या वेळी दिला. दुसरीकडे तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात आंदोलन होत असताना पोलिस मात्र या आंदोलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT