अमरावती महापालिकेत स्वीकृत सदस्यपदांच्या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी 8 स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. नव्या नियमांनुसार यंदा 8 जणांना संधी दिली जाणार असल्याने इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. या जागांवर आपली निवड व्हावी यासाठी विविध पक्षांतील नेते पक्षश्रेष्ठींकडे जोरदार प्रयत्न करत आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बूब मैदानात उतरले होते. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेषतः राणा यांच्या पराभवात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले गेले.
आता त्याच दिनेश बूब यांच्या नावाची चर्चा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून स्वीकृत सदस्यपदासाठी पुढे येत आहे. त्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना-बसपा गटाला मिळणाऱ्या एका जागेसाठी अजय गोंडाणे हेही इच्छुक असल्याचे बोलले जात असले, तरी शिंदे गटाकडून बूब यांच्या नावाला अधिक पाठबळ दिले जात आहे.
आताच झालेल्या महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवकांना मतदारांनी पराभूत केले. वर्षानुवर्षे राजकारणात सक्रिय असलेले काही माजी पदाधिकारी पुन्हा सभागृहात परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, स्वीकृत सदस्यपद ही त्यांच्यासाठी संधी मानली जात असून त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवत जोरदार फिल्डींग सुरु आहे.
पराभूत झालेल्यांमध्ये भाजपचे सुनील काळे, चेतन पवार, अजय गोंडाणे, माजी उपमहापौर संध्या टिकले, माजी महापौर वंदना कंगाले, रीना नंदा, रिपाइंचे प्रकाश बनसोड तसेच शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी काहींनी स्वीकृत सदस्यपदासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जाते. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या तुलनेने अधिक असल्याचेही चित्र आहे.
भाजपकडून अॅड. प्रशांत देशपांडे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती; मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांना स्वीकृत पदाचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याने दुसऱ्या जागेसाठी स्पर्धा वाढली आहे. काँग्रेसकडून पुन्हा मिलिंद चिमोटे यांना संधी देण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे.
राष्ट्रवादीतून समाजसेवक महेंद्र भुतडा, प्रशांत डवरे आणि अॅड. किशोर शेळके यांच्या नावांची चर्चा आहे. युवा स्वाभिमानकडून दिनेश सेठीया किंवा विनोद गुहे यांपैकी एकाची निवड होऊ शकते. एमआयएमकडून मात्र कोणाची निवड होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वीकृत सदस्यपदाच्या या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.