Shivsena UBT News
Shivsena UBT News Sarkarnama
विदर्भ

ShivSena UBT : नागपूर पूर्व-दक्षिणसाठी रंगला ठाकरेंच्या गटातच सामना !

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर शहरातील कुठला विधानसभा मतदारसंघ मागायचा यावर बऱ्याच दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत खल सुरू आहे. प्रत्येक पदाधिकारी आपआपल्या सोयीने मतदारसंघाचे नाव सुचवत आहे. त्यामुळे दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभेसाठी शिवसैनिकांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू आहे.

भाजपसोबत युती असतानाही शिवसेनेला अद्याप नागपूर शहरात पंचेवीस वर्षांत खाते उघडता आले नाही. पूर्व नागपूरमध्ये प्रवीण बरडे आणि शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते. मात्र त्याचे विजयात रुपांतर होऊ शकले नाही. त्यानंतर भाजपने पूर्व सोडून शिवसेनेला दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ दिला होता. आतापर्यंत तीन निवडणुका येथे शिवसेनेने लढल्या. विद्यमान जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया आणि किरण पांडव येथून लढले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मोठी फाटाफूट झाली आहे. जुने सोडून गेले, अनेक नवे चेहरे शिवसेनेत दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपला धडा शिकवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नागपूरमध्ये खाते उघडण्याचे निर्देश थेट मुंबईतून शिवसैनिकांना देण्यात आले आहे.

तत्पूर्वी मदारसंघ निवडण्यासाठी आतापर्यंत मुंबईत तीन बैठका झाल्या. माजी आमदार आणि शहराचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी पूर्व नागपूरला पसंती दिली आहे. ते स्वतःच येथून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांचे वडील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री पूर्वमधून तीन वेळा निवडूण आले होते. दुसरीकडे निष्ठावंत व कट्टर शिवसैनिकांनी दक्षिण नागपूरमध्ये निवडूण येण्याची येण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीत माजी संपर्क प्रमुख विनायक राऊत यांनी सुद्धा दक्षिण जास्त फायदेशीर राहील असे सुचवले आहे. जिल्हा प्रमुख तसेच माजी उपमहापौर किशोर कुमेरिया येथून प्रमुख दावेदार आहेत. महापालिकेतील आपला प्रभाग त्यांनी उद्यापही राखून ठेवला आहे. महापालिकेच्या सलग तीन निवडणूक ते जिंकले आहेत. काँग्रेस आणि भाजपलाही त्यांना आजवर रमणा मारोती प्रभागातून पराभूत करता आले नाही. असे असले तरी त्यांनाही शिवसेनेला दक्षिण जिंकून देता आले नाही. महायुतीमुळे राजकीय समीकरण बदलले आहे.

दक्षिणमध्ये सातत्याने काँग्रेसचा (Congress) उमेदवार निवडणूक लढत आहे. मागील निवडणुकीत भाजपचे मोहन मते आणि काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात चुरशीचा सामना रंगला होता. अवघ्या पाच हजार मतांच्या फरकाने पांडव यांचा पराभव झाला होता. ही जागा काँग्रेस सहजासहजी सोडणार नाही असे दिसते. मात्र रामटेक लोकसभेच्या बदल्यात नागपूर शहातील एक जागा काँग्रेसला सोडण्यास शिवसेना भाग पाडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यानुसार सर्व इच्छुकांना शिवसेनेच्या नेत्यांनी तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT