Sanjay Gaikwad : बुलढाणा शहरात 19 फेब्रुवारीला निघालेल्या शिवजयंती मिरवणुकीत एका तरुणाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली. या घटनेवरून आता विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी मारहाणप्रकरणी कारवाई होत नसेल, तर पीडितेच्या पाठीशी आम्हाला उभे राहावे लागेल, असा इशारा देऊन टाकला आहे.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच त्यांचे बॉडीगार्ड हे काही युवकांना बेदम मारहाण करीत असताना दिसून आलेत. आमदार गायकवाडांचे तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही त्यांच्या विविध वक्तव्यांचे तर काही राजकीय कामगिरीचे. मात्र मागील महिना भरापासून आमदार संजय गायकवाड हे जरा जास्तच प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. एका पाठोपाठ दोन गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल होणे, वाघाच्या शिकारीचा कपोलकल्पित किस्सा सांगणे आणि आता युवकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होणे या सर्व प्रकरणात मात्र त्यांनी काही काळ मौन साधले होते. मात्र पुन्हा त्यांनी समोर येत पत्रकार परिषद घेऊन यासर्व विषयावर भाष्य आणि खुलासा केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
‘माझ्याकडे एखादी मुलगी येते. ती संकटात आहे आणि ती मदत मागत आहे, मग मी पोलिसांची मदत पोहोचेपर्यंत मुलीवर बलात्कार होण्याची वाट पाहायची असती का?’ असा सवाल करीत आमदार गायकवाडांनी ‘होय मी त्या टोळक्यातील मुलांना चोप दिला. मुलींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवला. शिवरांनीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे हात छाटले. मी मारहाण केल्याची कोणतीही खंत मला नाही. पश्चाताप नाही. महिलांच्या अब्रुवर संकट असताना पोलिसांची वाट बघत बसणाऱ्यांपैकी मी नाही’, अशी ठाम कबुली बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. शनिवारी (ता. 2) बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.
वन बुलढाणा मिशनचे संयोजक तथा बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून घोषित झालेले संदीप शेळके यांनी टीका करीत महाराष्ट्राचा काय यूपी, बिहार करायचा आहे का, हे एक वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला सांगून टाकावे, अशी टीका केली होती. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी समोर येत म्हणाले की, ही मारहाण बघून मला बरे नाही वाटले, आमदारासारख्या कायद्याच्या रक्षकाने असे करणे योग्य नाही. त्या युवकाने पुढे येऊन पोलिसात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होईल. गुन्हा दाखल झाला नाही तर पीडिताच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.