BJP News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात २०२९ च्या निवडणुकीची राजकीय गणिते आतापासूनच आकाराला येताना दिसत आहेत. विद्यमान आमदार श्वेताताईंच्या राजकीय वाटचालीसोबतच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्या चिखलीतील संभाव्य राजकीय पुनर्वसनाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. २०२९ मध्ये कुणाल गायकवाड यांना चिखली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या चर्चेसाठी काही महिन्यांतील घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विविध राजकीय कार्यक्रम, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी चिखलीत आपली राजकीय उपस्थिती वाढवली आहे. संधी मिळेल तेव्हा संजय गायकवाड यांनी चिखलीच्या विद्यमान आमदारांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या चिखलीतील वाढत्या सक्रियतेकडे राजकीयदृष्ट्या वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.
कुणाल गायकवाड यांचे चिखलीत शक्तिप्रदर्शन :
कुणाल गायकवाड यांच्या राजकीय सक्रियतेची झलक नुकतीच त्यांच्या वाढदिवसानिमित्तही पाहायला मिळाली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी चिखलीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. कुणाल गायकवाड याची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या माध्यमातून चिखलीतील कार्यकर्त्यांशी संपर्क आणि मतदारसंघातील राजकीय वातावरणात स्वतःची उपस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.
विद्यमान आमदारांसमोर आव्हान?
चिखलीत एकीकडे विद्यमान आमदार श्वेता महाले यांना आगामी काळात आपले राजकीय स्थान कायम ठेवण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संजय गायकवाड आपल्या मुलासाठी मतदारसंघात राजकीय वातावरण तयार करत असल्याची चर्चा आहे. २०२९ ची विधानसभा निवडणूक अजून दूर असली तरी चिखलीतील राजकीय हालचाली पाहता दोन्ही बाजूंनी आतापासूनच तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. विद्यमान आमदारांना आपली पकड आणखी मजबूत करावी लागणार आहे, तर कुणाल गायकवाड यांच्यासाठी चिखलीत संघटन उभे करण्याचे आव्हान असेल.
गायकवाडांच्या हालचालींचा नेमका अर्थ काय?
संजय गायकवाड यांची चिखलीतील वाढलेली सक्रियता, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, राजकीय मेळावे आणि कुणाल गायकवाड यांचे झालेले शक्तिप्रदर्शन या सर्व घडामोडी एकत्रित पाहिल्यास त्यांच्या मुलाच्या राजकीय भवितव्याची चिखलीत तयारी सुरू असल्याचे संकेत मिळतात.
मात्र, २०२९ मध्ये उमेदवारीचा अंतिम निर्णय कोणत्या पक्षाच्या आणि कोणत्या राजकीय समीकरणातून होणार, हे सध्या स्पष्ट नाही. त्यामुळे कुणाल गायकवाड यांची चिखलीत उमेदवारी ही सध्या चर्चेपुरती असली, तरी त्यासाठीची राजकीय जमीन तयार करण्याचे प्रयत्न मात्र सुरू असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.